लता मंगेशकर यांच्यामुळे शक्ती कपूर यांना वडिलांनी माफ केलं होतं...! वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:25 IST2022-02-13T14:23:52+5:302022-02-13T14:25:15+5:30
Shakti Kapoor : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर आहे. लता मंगेशकर आणि शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्यात अत्यंत जवळचं नातं आहे.

लता मंगेशकर यांच्यामुळे शक्ती कपूर यांना वडिलांनी माफ केलं होतं...! वाचा किस्सा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या एक ना अनेक आठवणी, त्यांनी दिलेली अजरामर गाणी नेहमी आपल्यासोबत असतील. बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याबद्दलचा एक किस्सा शेअर आहे. लता मंगेशकर आणि शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांच्यात अत्यंत जवळचं नातं आहे. होय, शिवांगी कोल्हापुरी आणि पद्मिनी कोल्हापुरे या दोघी बहिणी लता मगेशकर यांच्या भाच्या होत्या. शिवांगी व पद्मिनी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे होते. त्याअर्थाने शक्ती कपूर हे लता मंगेशकर यांचे जावई होते.
‘आज तक’च्या कार्यक्रमात शक्ती कपूर यांनी त्यांची पत्नी व मंगेशकर कुटुंबाशी निगडीत एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, मी आणि माझी पत्नी शिवांगी आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एका व्हिलनसोबत लग्न हे शिवांगीच्या घरच्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पळून जावून लग्न केलं. माझ्या वडिलांना हे कळल्यावर ते सुद्धा संतापले. पण आईनी एकदा सुनेला बघून तर घ्या म्हणून त्यांची समजूत काढली. वडिलांनी मला व शिवांगीला दिल्लीला बोलवलं.
शिवांगी माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान. अतिशय सुंदर. तिला पाहताच, खूप सुंदर मुलगी आहे, असं माझे वडिल म्हणाले. यावर , बाबा ती गातेही खूप सुंदर असं मी म्हणालो. त्यांनी तिला गायला सांगितलं. तिने दोन ओळी गायल्या आणि माझे वडिल भावुक झालेत. तू इतकी सुंदर कशी काय गातेस, असा प्रश्न त्यांनी शिवांगीला केला. यावर ती मंगेशकर कुटुंबातून येते, असं मी वडिलांना सांगितलं आणि ते ऐकताच तुझ्या सर्व चुका माफ. कारण तू इतक्या मोठ्या कुटुंबात लग्न केलंय, असं मला म्हणाले.
माझी पत्नी शिवांगी आणि माझी मुलगी श्रद्धा कपूर दोघीही खूप चांगल्या गातात. त्यांच्यात मंगेशकर आणि कोल्हापुरे कुटुंबाचे जीन्स आहेत, असंही ते म्हणाले.