Shankar Mahadevan Breathless Hanuman Chalisa: ‘हनुमान चालिसा’ एका श्वासात? शंकर महादेवन नव्या विक्रमासाठी सज्ज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 16:39 IST2022-04-06T16:39:07+5:302022-04-06T16:39:57+5:30
Shankar Mahadevan Breathless Hanuman Chalisa: संपूर्ण हनुमान चालिसा एका श्वासात म्हणत शंकर महादेवन नव्या विक्रमाला गवसणी घालणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Shankar Mahadevan Breathless Hanuman Chalisa: ‘हनुमान चालिसा’ एका श्वासात? शंकर महादेवन नव्या विक्रमासाठी सज्ज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर हनुमान चालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरुन निशाणा साधला. मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्यासमोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असे जाहीर आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. यानंतर मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच आता आघाडीचे संगीतकार, गायक शंकर महादेवन यांनी आपल्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. लवकरच शंकर महादेवन (Shankar Mahadevan) ब्रेथलेस हनुमान चालिसा म्हणणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी संगीत क्षेत्रात विविध हटके प्रयोग करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली आणि ती सुपरहिट ठरली होती. यानंतर आता शंकर महादेवन ‘ब्रेथलेस’ हनुमान चालिसा म्हणताना दिसणार आहेत. अलीकडेच याबाबतची घोषणा केली आहे. संपूर्ण हनुमान चालिसा एका श्वासात म्हणत शंकर महादेवन नव्या विक्रमाला गवसणी घालणार का, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली
शंकर महादेवन यांनी याबाबतची घोषणा करताना सांगितले की, तुम्हाला सांगताना फार आनंद होतोय की, मला अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हनुमान चालिसा ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे, असे शंकर महादेवन यांनी म्हटले आहे. हनुमान चालिसा म्हणण्याचा वेग फार जास्त आहे. तसेच त्यातील काही शब्द कठीण आहेत. हनुमान चालिसाचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. हनुमान चालिसा पठण किंवा श्रवणाचे आपल्याला चांगले फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही हे नक्की ऐका, असे आवाहन शंकर महादेवन यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, शंकर महादेवन यांची ब्रेथलेस हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. ती नक्की कधी प्रदर्शित होईल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सन १९९८ मध्ये शंकर महादेवन यांनी ब्रेथलेस सॉंग सादर केले होते. यात त्याच्यासोबत जावेद अख्तरही होते. हे ब्रेथलेस सॉंग सुमारे तीन मिनिटांचे आहे. शंकर महादेवन यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमधील गीतांना संगीतबद्ध केले आहे तसेच अनेक भाषांमध्ये गायनही केले आहे.