एकेकाळी 'या' मराठमोळ्या अभिनेत्याकडे नव्हते लोन भरायचे पैसे; आज एका चित्रपटासाठी घेतो तगडं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:39 PM2022-02-14T17:39:10+5:302022-02-14T17:39:38+5:30
Actor: कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी या अभिनेत्याला प्रचंड कष्ट उपसावे लागले आहेत. एका मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.
कलाविश्वात आज असंख्ये सेलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि आलिशान घरांमुळे चर्चेत येतात. परंतु, हे आलिशान जीवन मिळविण्यामागे अनेक कलाकारांनी प्रचंड मेहनत आणि संघर्ष केला आहे. यात शाहरुख खान, सोनू सूद यांसारख्या कलाकारांचा संघर्ष साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, कलाविश्वात असाही एक अभिनेता आहे जो ज्याने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवलं आहे. मात्र, कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट उपसावे लागले आहेत. एका मुलाखतीत त्याने त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.
मराठीसह हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शरद केळकर (sharad kelkar). उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शरदने सुरुवातीच्या काळात मोठा स्ट्रगल केला आहे. शरदने मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या स्ट्रगल काळातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्याच्याकडे कर्जाचे हप्ते भरण्यापूरतेही पैसे नसल्याचं त्याने सांगितलं.
"एक वेळ अशी आली होती की माझ्या बँकेच्या खात्यात एक रुपयाही नव्हता. त्यात माझ्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज होतं. इतरांचेही पैसे द्यायचे होते. पण, क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसल्यामुळे ते सुद्धा बंद झालं होतं. लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटतं. पण, त्यांच्या यशामागे त्यांनी केलेला संघर्ष नाही दिसत", असं शरद म्हणाला.
दरम्यान, शरद मुळचा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. त्याचं संपूर्ण शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झालं आहे. कलाविश्वात येण्यापूर्वी तो स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत होता. परंतु, त्याच्यातील अभिनयाचा किडा त्याला स्वस्थ बसू देईना त्यामुळे त्याने नोकरीवर पाणी सोडत कलाविश्वाची वाट धरली.