फक्त अंडी खाऊन पोट भरायचा, स्ट्रगलविषयी शरद केळकर म्हणाला, 'एका खोलीत ९ मुलांसोबत..'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:19 PM2023-04-03T15:19:01+5:302023-04-03T15:23:14+5:30
शरद सांगतो, मी पहिल्यांदा सुट्टीसाठी चुलत भावाला भेटायला मुंबईत आलो होतो....
Sharad Kelkar : मराठी आणि हिंदीत आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा अभिनेता शरद केळकर. शरद फिल्म इंडस्ट्रीत १९ वर्षांपासून आहे. मालिका, सिनेमा आता ओटीटी अशा सर्वच माध्यमात त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केलं. छत्तीसगढमधील छोट्याशा गावात जन्माला आलेला शरद केळकरचा फिल्म इंडस्ट्रीपर्यंत येण्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. शरदने नुकतेच एका मुलाखतीत त्याच्या मुंबईतील सुरुवातीच्या स्ट्रगलच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
एका पॉडकास्टमध्ये शरद म्हणाला,' मी पहिल्यांदा सुट्टीसाठी चुलत भावाला भेटायला मुंबईत आलो होतो. त्याच वेळी मला फॅशन शोसाठी कॉल आला. मी बांद्राच्या बाजार रोडवर एका खोलीत ९ मुलांसोबत राहत होतो. तिथे एक राजस्थानी हॉटेल होते. ते डब्बा सर्व्हिस द्यायचे. एक चपातीसाठी २ रुपये आणइ काही अंडी मिळायची. कसंतरी मी गॅस सिलेंडरची व्यवस्था केली. माझी डील अगदी सामान्य होती. सकाळ संध्याकाळ चार अंडी आणि दोन चपाती बस एवढंच. २५ रुपयाच माझं काम व्हायचं.'
शरद पुढे म्हणाला,'तेव्हा मी काहीतरी कमाई व्हावी म्हणून एका जिम मध्ये प्रशिक्षक म्हणून जॉईन झालो. तिथे मला दरमहा 2750 रुपये मिळत होते. तर एका फॅशन शोमध्ये तीन मिनिटांच्या रॅम्पवॉकसाठी जेव्हा मला 5000 रुपये ऑफर झाले तेव्हा मी ते लगेच स्वीकारलं. माझ्या मनात मुंबईसाठी खास जागा तयार झाली होती आणि अशीच माझी सुरुवात झाली.'
'सात फेरे' आणि 'नच बलिए' सारख्या शोमधून घराघरात पोहोचलेला शरद केळकर आज स्टार आहे. सध्या तो हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत यश मिळवतोय. संघर्षपूर्ण सुरुवात केल्यानंतर आज शरद आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतोय.