शर्मिला टागोर यांनी 'आराधना' सिनेमाची केली RRR शी तुलना, म्हणाल्या, 'आमच्या काळी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:47 PM2023-04-13T12:47:56+5:302023-04-13T12:49:42+5:30
'आराधना' सिनेमाच्या रिलीजवेळी चेन्नईमध्ये हिंदी विरोधी आंदोलन सुरु झाले होते.
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी नुकतंच अभिनयात पुनरागमन केलंय. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या गुलमोहर सिनेमात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तेव्हा त्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत असे काही सिनेमे केले जे 'कल्ट' मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे 1969 मध्ये रिलीज झालेला 'आराधना' हा चित्रपट. शर्मिला टागोरने या सिनेमाची तुलना थेट एस एस राजामौलींच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमाशी केला आहे.
शर्मिला टागोर यांनी नुकतीच एका दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या, '1967 मध्ये फिल्म 'एन इव्हिनिंग इन पॅरिस' नंतर मी अर्थपूर्ण सिनेमे करायला सुरुवात केली. 'आराधना' सिनेमाच्या रिलीजवेळी चेन्नईमध्ये हिंदी विरोधी आंदोलन सुरु झाले होते. हिंदी भाषा बॉयकॉट असा प्रकार सुरु होता. अशा परिस्थितीतही आराधना सिनेमा ५० आठवडे चालला. आमच्या काळचा तो 'आरआरआर' सिनेमा होता. भावनेला भाषेचा अडथळा येत नाही. आपले चित्रपट, मग ते कोणत्याही भाषेतले असो ते लोकांना हसवतात, रडवतात. म्हणूनच आपली समानता मतभेदांपेक्षा अधिक आहे.
म्हणूनच शर्मिला टागोर यांनी 'आराधना' सिनेमाला त्यांच्या काळचा 'आरआरआर' म्हणलं आहे. एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. बराच काळ हा सिनेमा सिनेमागृहात तग धरुन होता. इतकंच नाही तर 'आरआरआर'ने आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाव उंचावलं आहे. 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 1200 कोटींचा गल्ला जमवला. तसंच या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारही मिळाला.