आफ्रिकन देशात आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्याची क्रेझ; त्याच्या नावावर दुकानात मिळतो डिस्काऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:12 AM2023-08-21T11:12:59+5:302023-08-21T11:23:55+5:30
या अभिनेत्याच्या कुटुंबातील जवळपास सगळेच जण बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत.
बॉलिवूडमध्ये आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित राहिलेली नाही. या कलाकारांनी त्यांच्या अभिनयशैलीमुळे विदेशातील प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. यात शाहरुख, सलमान, आमिर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांचं आवर्जून नाव घेतलं जातं. मात्र, या सगळ्यांमध्ये एक असा अभिनेता आहे ज्याच्या नाव सांगितल्यावर चक्क दुकानात खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळतो.
कपूर कुटुंबाचं आज बॉलिवूडमध्ये मोठं प्रस्थ आहे. या कुटुंबातील जवळपास सगळेच लोक कलाविश्वात सक्रीय आहेत. त्यातीलच एक लोकप्रिय दिवंगत अभिनेता म्हणजे शशी कपूर. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर शशी कपूर यांनी कलाविश्वावर राज्य केलं. इतकंच नाही तर त्यांनी विदेशातही प्रसिद्धी मिळवली. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता ओसरली नसून आफ्रिकन देशात त्यांचं नाव सांगितल्यावर डिस्काऊंट मिळतो.
१९६५ मध्ये त्यांचा जब जब फूल खिले हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने उत्तर आफ्रिकन देशामध्येही लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे या सिनेमामुळे त्यांच्या करिअरला एक नवी उंची मिळाली. इतकंच नाही तर आफ्रिकन देशामध्ये असे काही जुने दुकानदार आहेत जे शशी कपूर यांच्या नावाने चक्क दुकानात खरेदी केल्यावर डिस्काऊंट देतात.
'जब जब फूल खिले' हा शशी कपूर यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ओळखला जातो.या सिनेमातील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं होतं. त्या काळात हा सिनेमा इतका गाजला की लोक ब्लॅकने तिकीटं खरेदी करुन हा सिनेमा पाहत होते.. भारतानंतर या चित्रपटाला आफ्रिकेतही पसंती मिळाली होती. दरम्यान, अल्जेरिया, मोरेक्को आणि लिबिया यांसारख्या उत्तर आफ्रिकन देशांमध्ये शशी कपूर यांची तुफान क्रेझ आहे. शशी कपूर यांच्या देशातून आलेल्या पर्यटकांना मोरोक्कोमधील माराकेशच्या बाजारपेठांमध्ये खरेदीवर डिस्काऊंट दिला जातो.