'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:56 PM2024-05-09T13:56:46+5:302024-05-09T13:57:30+5:30
Bollywood actor: सुपरहिट सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही या अभिनेत्याला आहे. त्यामुळे आतागायत त्याने हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत.
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आज इंडस्ट्रीचे महानायक म्हणून ओळखले जातात. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य भूमिका वठवल्या. मात्र, १९७५ साली रिलीज झालेले दीवार आणि शोले हे दोन सिनेमा त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले. या दोन्ही सिनेमांमुळे ते रातोरात सुपरस्टार झाले. शोलीमधील जय-वीरुच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर, दीवारमधील अँग्री यंग मॅनने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. मात्र, या दोन्ही सिनेमांसाठी अमिताभ निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते. एका लोकप्रिय अभिनेत्याच्या नकारामुळे आज अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक ठरले.
या अभिनेत्याच्या नकारामुळे बदललं बिग बींचं नशीब
दीवार आणि शोले या सिनेमांसाठी अमिताभ बच्चन ही दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. त्यांच्या ऐवजी या दोन्ही सिनेमात प्रथम शत्रुघ्न सिन्हा यांना घ्यावं असं त्यांना वाटत होतं. १९७० ते ८० च्या काळात शत्रुघ्न सिन्हा इंडस्ट्रीतील सुपरस्टार होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला प्रत्येक दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असायचे. एका मुलाखतीमध्ये शत्रुघ्न यांनी स्वत: हे दोन सिनेमा रिजेक्ट केल्याचं सांगितलं.
दीवार,शोले रिजेक्ट केल्याचा आजही होतो पश्चाताप
"त्यावेळी माझ्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स होत्या आणि त्यातल्या काही रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही मला आहे. माझ्याकडे दीवारची स्क्रीप्ट जवळपास ६ महिने होते. पण, काही कारणास्तव ती न पटल्यामुळे मी परत केली", असं ते म्हणाले होतं. त्याचसोबत त्यांना शोलेदेखील ऑफर झाला होता. याविषयी रमेश सिप्पीने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. "शोलेची स्क्रिप्ट शत्रुघ्न सिन्हा यांना पाठवली होती. पण ते दुसऱ्या सिनेमात बिझी असल्यामुळे त्यांनी हा सिनेमा रिजेक्ट केला होता."
दरम्यान, या दोन्ही सिनेमात अमिताभ बच्चन झळकले याचा शत्रुघ्न सिन्हा यांना आनंदच आहे. मात्र, हे सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख देखील त्यांना आहे. त्यामुळे आजतागायत त्यांनी हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत.