"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:20 IST2024-12-12T11:20:24+5:302024-12-12T11:20:52+5:30
सोनाक्षीच्या लग्नावेळी तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश गायब होते. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया
शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) तिने रजिस्टर मॅरेज केलं. आंतरधर्मीय विवाह असल्याने सुरुवातीला सोनाक्षीच्या कुटुंबातून या लग्नाला विरोध होता. शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांनी लेकीला विरोध केला होता. मात्र सोनाक्षी काहीही ऐकण्याच्या तयारित नव्हती. अखेर लेकीच्या हट्टापुढे त्यांना होकार द्यावा लागला. मात्र या सगळ्यात सोनाक्षीच्या लग्नातील फंक्शन्समधून तिचे दोन्ही भाऊ लव-कुश हे गायब होते. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी आणि जहीर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर यावर्षीच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षीच्या कुटुंबाला मात्र तिचा निर्णय मान्य नव्हता. ज्यांच्या घराचं नाव रामायण, मुलांचं नाव लव कुश आहे अशा घरातील लेक मुस्मिल कुटुंबात जाणार हे अनेकांना रुचणारं नव्हतंच. सोनाक्षी यावरुन ट्रोलही झाली. दरम्यान तिच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ दिसले नाहीत. यासंदर्भात नुकत्याच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "लग्न त्यांचं आहे, त्यांचं आयुष्य आहे. मग मी कोण त्यांच्यामध्ये येणारा? आईवडील म्हणून लेकीला पाठिंबा देणं माझं कर्तव्य आहे. आजच्या जगात आपण महिला सबलीकरणाविषयी बोलतो. मग हे काही बेकायदेशीर काम तर नाहीए. तुम्ही कायद्याचं पालन करत आहात. जर हे कायद्यात नसतं तर आम्ही नकार दिला असता. पण दोघंही एकमेकांसाठीच बनले आहेत. 'मेड फॉर इच अदर' कपल आहे."
या लग्नाला तुमच्या मुलांनी विरोध केला याचं वाईट वाटतं का? यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "याविषयी आपण नंतर बोलू. माझी यासंदर्भात कोणतीच तक्रार करणार नाही. आपण माणसंच आहोत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतातच. अनेकांना कल्चरल शॉक लागतो. कदाचित त्यांच्यात इतकी मॅच्युरिटी नसेल. मी त्यांचा झालेला गोंधळ, त्यांना झालेलं दु:खही नक्कीच समजू शकतो. मी त्यांच्या वयाचा असतो तर कदाचित मीही असाच विचार केला असता. पण आज मी मोठा आहे, मला गोष्टींची समज आहे, आयुष्याकडून इतकं काही शिकलो आहे. त्यामुळे मी खंबीरपणे सोनाक्षीसाठी उभा होतो."