Shatrughan Sinha : तो सिनेमा माझ्यासाठी लिहिला होता, आजही पश्चाताप होतो..., अखेर शत्रुघ्न सिन्हा बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 10:14 AM2023-02-19T10:14:51+5:302023-02-19T10:18:38+5:30
Shatrughan Sinha : तो सिनेमा हातचा गेला, त्याचा आजही पश्चाताप होतो, अशी प्रांजळ कबुली शत्रुघ्न यांनी यावेळी दिली.
सर्वांना 'खामोश' करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) व अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं नातं जगजाहिर आहे. त्याकाळात दोघांमध्ये जराही पटायचं नाही. या दोघांमध्ये पडद्यामागे नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. अर्थात दोघंही यावर कधीच जाहिरपणे बोलले नाहीत. मात्र आता इतक्या वर्षानंतर शत्रुघ्न सिन्हा यावर बोलले.
कोलकात्यात 'आज तक'च्या कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी अगदी मनमोकळेपणानं बोलले. कलाकारांमध्ये आपआपसात अनेकदा संघर्ष पाहायला मिळतो, याचं कारण काय? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, असा संघर्ष होतच असतो. तरूणपणी उन्माद असतो. जोश असतो. प्रत्येकाचे वेगवेगळे चाहते असतात आणि त्यामुळे तुम्ही आपोआप वेगवेगळ्या गटात विभागले जाते. चाहते एखाद्याला डोक्यावर घेतात, एखाद्याला कमी लेखलं जातं. यातून संघर्ष निर्माण होतो. पण आजच्या घडीला माझं कुणाशीही शत्रूत्व नाही, असं ते म्हणाले.
याच प्रश्नाचं उत्तर देताना अमिताभ बच्चन यांचाही उल्लेख झाला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुमचा कधी संघर्ष झाला का?, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, मी आधीच म्हणालो त्याप्रमाणे जवानीचा जोश असतो. अमिताभ व माझी जुनी मैत्री आहे. आधी आमच्यात खूप खटके उडायचे. पण आत्ता तसं काही राहिलेलं नाही. कारण त्यावेळी नेम फेमचं भूत डोक्यावर होतं. काळानुसार, सगळं बदललं. आता सगळं ठीक आहे.
मला त्याचा आजही पश्चाताप होतो...
होय, दीवार हा सिनेमा हातचा गेला, त्याचा आजही पश्चाताप होतो, अशी प्रांजळ कबुली शत्रुघ्न यांनी यावेळी दिली. दीवार हा सिनेमा माझ्यासाठी लिहिला गेला होता. पण मी हा सिनेमा करू शकलो नाही, याचं आजही दु:ख होतं. सहा महिन्यापर्यंत या सिनेमाची स्क्रिप्ट माझ्याकडे पडून होती. पण काही मतभेद झाले आणि मी हा सिनेमा सोडला. मला शोले सुद्धा ऑफर झाला होता. यात मला गब्बरची भूमिका देऊ केली होती. पण डेट्स मॅच होत नव्हत्या, त्यामुळे हा सिनेमाही माझ्या हातून गेला. माझ्याकडे त्यावेळी करायला इतके सिनेमे होते की मी ते करू शकत नव्हतो. शोर या सिनेमातील प्रेमनाथची भूमिका मला करायची होती. मी यासाठी चार महिन्यांचा वेळही मागितला होता. पण हा सिनेमाही वेळेअभावी मी करू शकलो नाही. मनोज कुमार घरी येऊन सिनेमे न करण्याचं कारण विचारायचे. त्यांना काय सांगणार की, मी करू शकत नाहीये. पण आनंद आहे की मी चांगलं काम केलं. जे काही मिळवलं त्यात मी आनंदी आहे. अमिताभ यांनी माझ्यासोबत काम केलं आणि सुपरस्टार बनलेत, याचाही मला आनंद आहे, असं ते म्हणाले.