बॉलिवूडनं माझी ‘पंचिंग बॅग’ केली..! अभिनेता शरत सक्सेना यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:29 PM2021-07-15T12:29:46+5:302021-07-15T12:30:46+5:30

ज्येष्ठ कलाकारांसाठी ज्या काही चांगल्या भूमिका असतात, त्या फक्त अमिताभ बच्चन यांनाच मिळतात आणि माझ्यासारख्यांना उरलेल्या भूमिका मिळतात,असंही ते म्हणाले.

sherni actor sharat saxena on his role in films said all good roles written for old people goes to amitabh-bachchan | बॉलिवूडनं माझी ‘पंचिंग बॅग’ केली..! अभिनेता शरत सक्सेना यांची खंत

बॉलिवूडनं माझी ‘पंचिंग बॅग’ केली..! अभिनेता शरत सक्सेना यांची खंत

googlenewsNext
ठळक मुद्देशरत यांनी 1970 च्या दशकात सहाय्यक भूमिका साकारत करिअरची सुरूवात केली. मिस्टर इंडिया, बागबान, क्रिश, गुलाम, साथियां, बजरंगी भाईजान अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.

शरत सक्सेना (Sharat Saxena) हे बॉलिवूडचे एक दिग्गज अभिनेते. अलीकडे विद्या बालनच्या ‘शेरनी’ या सिनेमात ते दिसले होते. 71 वर्षांच्या शरत यांची या सिनेमातील मस्कूलर बॉडी पाहून सगळेच हैराण झाले होते. पण तूर्तास त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. वय वाढले आणि इंडस्ट्रीने आपल्याला अगदी तांदळातल्या खड्यासारखं दूर फेकलं, अशी खंत एका ताज्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केली. बॉलिवूडनं मला एका पंचिंग बॅगसारखं वागवलं, असंही ते म्हणाले.
आपल्या 44 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये शरत सक्सेना यांनी अनेक बड्या सिनेमांत काम केलं. पण त्यांना इंडस्ट्रीत कधीच तो मानसन्मान मिळाला नाही. ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत शरत यावर भरभरून बोलले.

रजा मुरादनं माझ्याबद्दल अफवा पसरवली...
अभिनेता रजा मुराद यानं माझ्याबद्दल अफवा पसरवली होती. यामुळे माझ्या कामाचं खूप मोठं नुकसान झालं, असा आरोप शरत यांनी या मुलाखतीत केला. मी चेन्नईला शिफ्ट झालो, असं त्यानं इंडस्ट्रीत पेरलं. यामुळे फिल्मच्या लोकांनी माझ्याशी संपर्क तोडला आणि मी अनेक सिनेमे गमावून बसलो, असं त्यांनी सांगितलं.

मी फक्त पंचिंग बॅग होतो...
मी नेहमीच मस्कुलर मॅन होतो. त्यामुळं मला अ‍ॅक्शन रोलच अधिक मिळाले. हिरोकडून मार खाणं हेच माझं काम होतं. (Bollywood Treated Me Like a Punching Bag)  काला पत्थर या सिनेमात मी अमिताभ, शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या एन्ट्री सीनमध्ये होतो. प्रत्येकजण मला मारायचा आणि हिरो म्हणून चमकायचा. मी चित्रपटांत पंचिंग बॅग होतो आणि हीच माझ्या करिअरच्या पहिल्या 35 वर्षांची कहाणी आहे, असं ते उद्विग्न होऊन म्हणाले.

इंडस्ट्रीला म्हाता-यांची गरज नाही...
बॉलिवूड आता तरूणांची इंडस्ट्री आहे. इथं आता म्हाता-यांची गरज नाही. आम्हालाही काम हवं आहे. पण म्हाता-या लोकांसाठी भूमिकाचं नाहीत. ज्या काही चांगल्या भूमिका आहेत, त्या अमिताभ बच्चनला (Amitabh Bachchan) दिल्या जातात. जो काही कचरा उरतो तो माझ्यासारख्यांकडं येतो, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

मी रोज दोन तास कसरत करतो...
मी आज 71 वर्षांचा आहे. पण मनानं अजूनही तरूण आहे. तरूण दिसण्यासाठी मी माझे केस रंगवतो, मिशा रंगवतो. रोज दोन तास कसरत करतो. जेणेकरून मी एक तरूण दिसेल. तरूण दिसलो नाही तर कोणी मला काम देणार नाही, असंही ते म्हणाले.

शरत यांनी 1970 च्या दशकात सहाय्यक भूमिका साकारत करिअरची सुरूवात केली. मिस्टर इंडिया, बागबान, क्रिश, गुलाम, साथियां, बजरंगी भाईजान अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
 

Web Title: sherni actor sharat saxena on his role in films said all good roles written for old people goes to amitabh-bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.