शिल्पा शेट्टीविरोधातील 11 वर्षे जुना खटल्यावर लागला निकाल, सलमान खानचंही आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:15 PM2024-11-22T14:15:48+5:302024-11-22T14:18:13+5:30
शिल्पा शेट्टी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. अलीकडेच न्यायालयाने तिच्या 11 वर्षे जुन्या एका खटल्यात निकाल दिला आहे. हे प्रकरण 2013 चे आहे. शिल्पाच्या एका वक्तव्यामुळे तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यावर आता नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती अरुण मोंगा यांनी हा एफआयआर फेटाळला.
अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान 'भंगी' शब्दाचा वापर केला होता, त्यानंतर तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सलमान खानही उपस्थित होता. शिल्पा शेट्टीच्या या वक्तव्यामुळे चुरूच्या कोतवाली पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी शिल्पाला दिलासा देत राजस्थान उच्च न्यायालयाने तिच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द केला आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर माफीही मागितली होती. या प्रकरणी 2017 मध्ये शिल्पा शेट्टीच्याविरुद्ध चुरूच्या कोतवाली पोलिस ठाण्यात एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 वर्षे जुन्या प्रकरणात शिल्पा शेट्टीला दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती मोंगा यांनी आपल्या निर्णयात स्पष्टपणे सांगितले की, एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यापूर्वी योग्य कलम आणि तपास करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, 'भंगी' हा शब्द कोणत्याही जातीचा किंवा जातीशी संबंधित शब्दाचा भाग नाही. ज्याचा वापर इतर कोणाचाही अपमान करण्यासाठी केला गेला नाही तर स्वतःचा उल्लेख करण्यासाठी केला गेला होता.
शिल्पा आणि सलमान विरोधात ही तक्रार एका व्यक्तीने केली होती. 2017 मध्ये वाल्मिकी समाजाच्या अशोक पनवार यांनी शिल्पा आणि सलमान विरुद्ध एससी/एसटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की, 2013 मध्ये एका टीव्ही मुलाखतीदरम्यान या दोघांनी वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावणारा 'भंगी' शब्द वापरला होता. तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि 18 जानेवारी 2018 रोजी तपास अधिकाऱ्यांनी दोघांनाही नोटीस बजावली. शिल्पा शेट्टी या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती.