९७ कोटींची संपत्ती जप्त झाल्यानंतर राज कुंद्राची पोस्ट, म्हणतो- “बस्सं झालं आता…”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:36 PM2024-04-19T17:36:22+5:302024-04-19T17:36:39+5:30
"जेव्हा तुमचा...", ED ने प्रॉपर्टी जप्त केल्यानंतर राज कुंद्राची पोस्ट
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला ईडीकडून गुरुवारी(१८ एप्रिल) दणका मिळाला. राज कुंद्रा याची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी ईडीने कारवाई करत राज कुंद्राची मालमत्ता जप्त केली. यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू येथील बंगला, पुण्यातील निवासी बंगला आणि कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्स याचा समावेश होता. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राने पोस्ट शेअर केली आहे. कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. सिंहाचा फोटो असलेला एक कोट त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. "जेव्हा तुमचा अपमान केला जातो तेव्हा शांत राहायला शिकणं, ही वेगळ्या प्रकारची प्रगती आहे," असं राज कुंद्राने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याबरोबरच त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो म्हणतो, "चांगली माणसं बनण्याची एक वेळ असते...आणि बस्स झालं आता असं म्हणण्याचीदेखील वेळ असते".
दरम्यान, राज कुंद्रावर बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रावर ही कारवाई करण्यात आली. याआधी पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं रॅकेट चालवतं असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. अनेक महिलांनी राज कुंद्राविरोधात साक्ष दिली होती. याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली.