आपण एकमेकांना वचन दिलंय...., लग्नाच्या वाढदिवशी शिल्पा शेट्टीची राजसाठी स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:13 AM2021-11-22T10:13:14+5:302021-11-22T10:23:03+5:30
Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary : आज शिल्पा व राजच्या लग्नाचा वाढदिवस. हेच निमित्त साधत शिल्पाने राजसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
गेल्या काही दिवसांत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty ) बराच मनस्ताप भोगला. पती राज कुंद्रा (Raj Kundra )पोर्नोग्राफी प्रकरणी तुरूंगात गेला. पतीच्या या कारनाम्यांमुळे या काळात शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. यामुळे काही दिवस तिला कामही थांबवावं लागलं. यादरम्यान पतीला जामीन मिळाला आणि शिल्पाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आताश: ती कामावर पतरली आहे. सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह झाली आहे. तूर्तास तिची एक पोस्ट व्हायरल होतेय. आज शिल्पा व राजच्या लग्नाचा 12 वा वाढदिवस (Shilpa Shetty Raj Kundra Wedding Anniversary). हेच निमित्त साधत शिल्पाने राजसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
लग्नाच्या फोटोंचा कोलाज शेअर करत, तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘या क्षणी आणि 12 वर्षांपूर्वी आपण एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते आजही पूर्ण करतोय. एकमेकांसोबत आनंदी क्षण घालवण्याचे, कठीण काळात एकमेकांची सोबत देण्याचे, प्रेमावर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे वचन आपण सोबत निभवणार आहोत. 12 वर्षे आणि आणखी किती ते मी मोजू शकत नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..कुकी! इथे आनंद आहे, अनेक मैलाचे दगड आहेत, शिवाय आपली बहुमोल संपत्ती म्हणजेच आपली मुलं आहेत. आमच्या चांगल्या आणि वाईट काळात साथ देणाºया सर्व शुभचिंतकांचे मनापासून आभार.’
राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा नाराज असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. शिल्पा राजला घटस्फोट देणार, असंही म्हटलं गेलं होतं. पण आता शिल्पाच्या या पोस्टने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दोन महिन्यांनंतर मुंबई न्यायालयाने राजला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. जामिनावर सुटल्यापासून राज सोशल मीडियापासून दूर आहे. त्याने त्याचे अकाऊंट्ससुद्धा डिलीट केले आहेत.