हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:36 IST2025-02-09T17:36:02+5:302025-02-09T17:36:16+5:30
शिवांगी जोशीनं महाकुंभ मेळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हर हर गंगे! शिवांगी जोशी पोहोचली महाकुंभ मेळ्यात, केलं पवित्र स्नान
Maha Khumbh Mela 2025: सध्या सर्वत्र उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरू आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आतापर्यंत कोट्यावधी भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट देत पवित्र स्नान केलं आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गज मंडळींनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. तसंच सिनेविश्वातील कलाकारदेखील महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळाले. आता या यादीत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीचं (Shivangi Joshi) नाव सामील झालं आहे.
शिवांगी जोशीनेही सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसून येत आहे. शिवांगीनं मोठ्या भक्तीभावात संगमात डुबकी घेतली. तसेच तिनं स्वामी कैलाशानंद गिरी यांचे आशीर्वादही घेतले. इतकंच नाही तर अभिनेत्रीनं महाकुंभमेळ्यात नृत्यही सादर केले. शिवांगी ही कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसते. आता तिने महाकुंभ मेळाला हजेरी लावून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
शिवांगी जोशीपुर्वी पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, हेमा मालिनी, दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी, नीना गुप्ता, संजय मिश्रा, अनुपम खेर यांनीही महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे. अगदी कोल्डप्लेच्या ख्रिस मार्टिनने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री डकोटा जॉन्सनसह संगमात पवित्र स्नान केले. महाकुंभ हा माणसं एकत्र येण्याचा जगातील सर्वात मोठा मेळा असल्याचं मानलं जातं. इथल्या संगमावर भाविक स्नान करतात. गंगा, यमुना आणि पौराणिक नदी सरस्वती यांचा हा संगम आहे. पवित्र समजल्या जाणाऱ्या या नद्यांच्या पाण्यात स्नान केल्यामुळे सर्व पापं धुतली जातील आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्ष मिळेल अशी भाविकांची श्रद्धा असते.