Shocking:स्पेनमध्ये असलेली अभिनेत्री आली अडचणीत , नवऱ्याचे चेकअप करण्यास डॉक्टरांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:28 AM2020-04-16T11:28:16+5:302020-04-16T11:31:18+5:30
स्पेनमध्ये 1 लाख 72 हजार 541 लोक संक्रमित आहेत आणि आतापर्यंत 18 हजार 56 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
कोरोनाने सध्या सर्वत्रच थैमान घातलंय. बघावं तिथे कोरोनाने सा-यांनाच धडकी भरवली आहे. कोणताही आजार झाला असला तरी कोरोनाची लागण तर नाही ना झाली याची शहानिशा सध्या डॉक्टर करताना दिसतायेत. कोरोनामुळे सर्वासमान्यांपासून सेलिब्रेटींचे देखील जीवन अस्ताव्यस्थ झाले आहे. लग्नानंतर श्रिया स्पेनमध्ये स्थायिक झाली आहे. गेल्याचवर्षी 13 मार्च रोजी श्रीयाने आंद्रईसोबत लग्न केले होते. स्पेन हा देश देखील कोरोनासाठी हॉटस्पॉट बनला आहे. हा अशा देशांपैकी एक आहे जिथे कोरोनाव्हायरस संसर्ग खूप जास्त आहे. येथे 1 लाख 72 हजार 541 लोक संक्रमित आहेत आणि आतापर्यंत 18 हजार 56 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. स्पेनमध्ये भयावह परिस्थितीत नागरिक राहत आहेत. कधी या संकटातून सा-यांची मुक्तता होईल याचीच दिवसरात्र ते प्रार्थना करत आहेत.
अभिनेत्री श्रिया सरनने तिचा स्पेनमधील अनुभव सांगितला. श्रिया सध्या स्पेनमध्ये पती आंद्रेई कोशीवसोबत स्पेनमध्ये राहते. आंद्रेईला काही दिवसांपूर्वी सर्दी खोकला झाला होता.त्यासाठी तिने लगेच तेथील हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना चेकअप न करताच तिथून त्यांना जाण्यास सांगितले. कोणत्याही प्रकारची मेडीकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे आंद्रेईवर घरी उपचार केले गेले. खबरादारी म्हणून दोघेही स्वतंत्र खोल्यांमध्ये झोपायचे दोघांनी योग्यरित्या एकमेकांपासून डिस्टन्स मेंटेन केला. काही दिवसांसाठी दोघांनी एकमेकांना वेगवेगळ्या खोलित बंद करून घेतले होते. आता आंद्रेईला बरे वाटत आहे आणि देवाच्या कृपेने वाईट काळ मागे गेला असल्याचे या अभिनेत्रीने म्हटले आहे.
संपूर्ण स्पेनमध्ये लॉकडाऊन आहे. पोलिसांनी यानंतर नियम बनवला की, घरातील एकच व्यक्ती एकावेळी बाहेर पडू शकेल आणि तेही जेव्हा बाहेर पडणे फारच गरजेचे असेल. एकदा पोलिसांनी श्रिया आणि आंद्रेईला अडवले होतं, कारण आंद्रेई गोरा आणि ती सावळ्या रंगाची होती. त्यानंतर पोलिसांना समजले की, दोघेही पती-पत्नी आहेत. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.