म्हणून आता श्रद्धा कपूरला करायचीय मराठमोळी लावणी !
By सुवर्णा जैन | Published: January 23, 2020 12:25 PM2020-01-23T12:25:54+5:302020-01-23T12:27:53+5:30
'छिछोरे', 'बागी', आणि आता ' स्ट्रीट डान्स 3 डीट', या तिन्ही सिनेमांचे जॉनर वेगवेगळे आहेत. मला सगळ्याच प्रकारचे काम करायला आवडते. अमुक एक भूमिका असावी याबाबत मी काही फार आग्रही नसते.
सुवर्णा जैन
'स्ट्रीट डान्सर 3 डी' या सिनेमातून अभिनेत्री श्रद्धा कपूर रसिकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने साधलेल्या खास संवादात श्रद्धाने लावणी, डान्सची आवड, जीवनातील आव्हानं यासह विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.
श्रद्धा... मराठी भाषा तुझ्यासाठी नवी नाही तसंच मराठीतील लावणीही नवी नसेल.. तुझा सिनेमा डान्सवर आधारित आहे तर लावणीवर तुला डान्स करायला आवडेल का?
मुळात लावणी हा नृत्यप्रकार किती सुंदर आहे. मात्र लावणी सादर करणं नक्कीच सोपं नाही. हा अत्यंत कठीण नृत्यप्रकार आहे. असं असलं तरी लावणी करायला मलाही आवडेल. त्यासाठी मला खूप सरावही करावा लागेल. जर कुणी एखादा सिनेमा बनवला आणि त्यात लावणी असेल तर मला नक्की काम करायला आवडेल.
डान्सची तुला किती आवड आहे?
मला डान्सची प्रचंड आवड आहे. लहानपणी मी आरशासमोर उभी राहून डान्स करायचे. आई माझ्या रुममध्ये छुपा कॅमेरा लावायची. जेव्हा जेव्हा ''आय लव्ह यू, प्रेम करू छूँ'' गाणं वाजायचं तेव्हा मी पळत यायचे आणि गाण्यावर ताल धरायची. बालपणापासूनच मला डान्सचं वेड आहे. प्रभूसरांना डान्स करताना पाहायची. त्यांचा मुकाबला गाण्यावरील डान्स तर कमाल आहे. याशिवाय हृतिक रोशन, गोविंदा यांना डान्स करताना पाहून मलाही त्यांच्यासारखंच डान्स करायची इच्छा व्हायची. ज्यावेळी मला 'एबीसीडी-२' सिनेमाची ऑफर आली त्यावेळी मला आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर मी डान्सचा बराच सराव केला. या सगळ्याबद्दल सगळं श्रेय मी वरुणला देईल. माझी डान्सची आवड त्याला माहिती आहे. त्यानंच रेमो सरांना माझं नाव सुचवलं. श्रद्धा डान्सची वेडी असून तिलाच या सिनेमात घ्या असं त्यानं रेमो सरांना सांगितलं.
तुझ्यासाठी जीवनात सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट कुठली आहे?
स्वतःमध्ये बदल करणं हेच माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक आहे. तोच तोचपणा राहिला की आयुष्य रटाळवाणं वाटू लागतं. त्यामुळे स्वतःला आव्हान देत नवनवीन गोष्टी करत राहणं गरजेचं वाटतं.
बॉलिवूडमधील तुझ्या यशाचं गमक काय आहे असं तुला वाटतं?
२०१९ साली माझ्या दोन्ही सिनेमांना चांगलं यश मिळालं. कोण काय म्हणेल यापेक्षा मी कायमच माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करते. माझ्या कामातून मला समाधान मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे नेहमी मी आधीपेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते.
तू आज बॉलिवूडमध्ये प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहेस. तुझे जसे फॅन्स आहेत तसे क्रिटीकही असतील. तर तुझे सगळ्यात मोठे क्रिटीक्स कोण आहेत?
माझे मित्र माझे सगळ्यात मोठे क्रिटीक आहेत. ते कायम मला माझ्या सिनेमाबद्दल किंवा भूमिकेबद्दल खटकणाऱ्या गोष्टी सांगतात. त्यानुसार काय बदल केले पाहिजे किंवा कोणत्या भूमिका कराव्यात याबाबत ते मार्गदर्शन करत असतात. विराज, अंकिता , हृषिता, फजा, ही सगळी माझी मित्रमंडळी मला नेहमी काही ना काही टीप्स देत असतात. त्यात माझ्या आई बाबांचा नेहमी पाठबळ मिळत असतं.
तुला कोणत्या प्रकारची भूमिका साकारण्याची इच्छा आहे?
'छिछोरे', 'बागी', आणि आता ' स्ट्रीट डान्स 3 डीट', या तिन्ही सिनेमांचे जॉनर वेगवेगळे आहेत. मला सगळ्याच प्रकारचे काम करायला आवडते. अमुक एक भूमिका असावी याबाबत मी काही फार आग्रही नसते.
स्टार किड्स म्हणजेच शक्ती कपूर यांची लेक असल्याचा तुला बॉलिवूडमध्ये कितपत फायदा झाला?
जेव्हा मी अभिनय क्षेत्रातून बालिवूडमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी मी शक्ती कपूर यांची मुलगी हे फार कमी लोकांना माहिती होतं. 'तीन बत्ती' सिनेमातून मी पदार्पण केले. दिग्दर्शकाने माझा फोटो फेसबुकवर पाहिला होता. फोटो पाहून मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं. आज जसे सिनेमा येण्याआधीच स्टार किडस लोकप्रिय होतात. मात्र माझी सुरूवात ही स्टारकिड्सप्रमाणे झालीच नाही. माझे सुरूवातीचे दोन्ही सिनेमा फ्लॉप झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुणाचीली मुलं असू द्या, तुमचं काम चांगलं असेल तरच तुम्हाला स्वीकारलं जातं. तुमचं कामच त्याची पोचपावती देतं.