प्रपोज केलं भेटायला बोलावलं आणि दीप्तीचा चेहराच विसरला श्रेयस; काय आहे तो किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 04:35 PM2024-02-14T16:35:34+5:302024-02-14T16:35:46+5:30
फिल्मी जगात घट्ट पाय रोवणाऱ्या श्रेयसचे लव्ह लाईफही तेवढेच फिल्मी आहे.
अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. छोट्या पडद्यावरील मालिका, मराठी चित्रपट ते बॉलीवूड असा संपूर्ण प्रवास करत अभिनेत्याने यशाचं शिखर गाठलं. फिल्मी जगात घट्ट पाय रोवणाऱ्या श्रेयसचे लव्ह लाईफही तेवढेच फिल्मी आहे. एका कॉलेजच्या मुलीवर श्रेयसचा जीव जडला आणि जेव्हा तिला भेटायला बोलावलं, तेव्हा तिचा चेहराच तो विसरला. जिचा तो चेहरा विसरला, तीच तरुणी आज त्याची बायको आहे.
सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त श्रेयसने 'मित्र म्हणे' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदे देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. या मुलाखतीत श्रेयस आणि दीप्ती या दोघांनी प्रेमावर भाष्य केलं. पहिल्या भेटीतच दीप्तीच्या प्रेमात पडल्याचं श्रेयसनं सांगितलं. पहिल्या भेटीनंतर जेव्हा फोनवर तो तिला बोललो. तेव्हा श्रेयसनं दीप्तीला थेट लग्नासाठीच विचारलं होतं. मला आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, अशी थेट मागणी श्रेयसने दीप्तीला घातली होती. पण, जेव्हा तो दुसऱ्यांदा तिला भेटला. त्यावेळी तिचा चेहराच श्रेयस विसरला होता.
श्रेयसनं सांगितलं, 'दीप्तीच्या कॉलेज तर्फे मला सेलिब्रिटी म्हणून आमंत्रण देण्यात आलं आणि त्या इव्हेंटची जबाबदारी दीप्तीकडे होती. त्याचवेळी दिप्ती मला आवडली. त्यानंतर आम्ही फोनवर बोललो आणि मी तिला प्रपोज केलं. पहिल्या भेटीनंतर चौथ्याच दिवशी मी तिला शिवाजी मंदिरजवळ भेटायला बोलावलं. मी तिथे तिची वाट पाहत उभा होतो. ती जेव्हा आली तेव्हा मी तिला ओळखलंच नाही. आपण पसंत केलेली मुलगी हीच आहे का असा विचार मी करत होतो. त्यानंतर तिनं मला हात केला, तेव्हा ही तीच असल्याचं लक्षात आलं'.
श्रेयसने 31 डिसेंबर 2004 रोजी दीप्तीसोबत लग्न केले. दीप्ती व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ आहे. श्रेयसबद्दल रंजक बाब म्हणजे एखाद्याचा चेहरा त्याच्या लगेच लक्षात राहत नाही. एखादी व्यक्ती वारंवार संपर्कात आल्यानंतर तो चेहरा श्रेयसच्या लक्षात राहतो. श्रेयसला १५ डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंगवरून परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला मृत्यूच्या दाढेतून पत्नी दीप्तीने ओढून आणत त्याचे प्राण वाचवले होते.