श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..."
By ऋचा वझे | Updated: January 27, 2025 15:14 IST2025-01-27T15:13:10+5:302025-01-27T15:14:19+5:30
श्रेयस तळपदे स्वत:च्या युट्यूब चॅनलवर 'दिलखुलास' हे पॉडकास्ट करतो.

श्रेयस तळपदेने का सुरु केलं पॉडकास्ट? म्हणाला, "गेल्या वर्षी आलेल्या आजारपणानंतर..."
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आज ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रेयस मराठीसोबतच हिंदी, साऊथ इंडस्ट्रीतही सक्रीय असतो. 'पुष्पा' आणि 'पुष्पा २' या गाजलेल्या सिनेमांसाठी त्याने आवाज दिला. अल्लू अर्जुनसाठी त्याने केलेलं डबिंग सगळ्यांनी डोक्यावर उचलून धरलं. श्रेयस तळपदेने त्याच्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असं सगळंच काम केलं आहे. पण आता युट्युबवरुन पॉडकास्टमच्या माध्यमातूनही दिसतो. अचानक पॉडकास्ट का सुरु केला याचं कारण त्याने मुलाखतीत सांगितलं.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदे म्हणाला, "हे खरंतर माझ्या काही मित्रांनीच मला सुचवलं. मागच्या वर्षी माझं आजारपण झालं. त्यावरून त्यांचं म्हणणं होतं की मी पॉडकास्ट करावं. यामध्ये डॉक्टर, वकील यांना बोलावून जनजागती करावी. तसंच इंडस्ट्रीतही माझे मित्र इतके मित्र आहेत त्यांच्यासोबतही दिलखुलास बोलता येईल असा त्यामागचा हेतू होता. यानिमित्ताने मित्रांना भेटणं होतं, गप्पाही होतात. एरवी ४ वर्षातूनही अनेकदा भेट होत नाही. म्हणूनच पॉडकास्टचं नावही 'दिलखुलास' असंच ठेवलं."
श्रेयस तळपदेला डिसेंबर २०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा सगळे चाहते, त्याचं कुटुंब, मित्रपरिवार चिंतेत पडले होते. श्रेयसचा जीव थोडक्यात वाचला होता. कही सेकंदांसाठी त्याचा श्वास बंद पडला होता असंही त्याने नंतर मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.
श्रेयस नुकताच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसला. कंगना राणौतच्या या सिनेमात त्याने अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारली. याशिवाय तो आता अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल' सिनेमात दिसणार आहे. तसंच 'द इंडिया स्टोरी' या सिनेमाचंही शूटिंग सुरु आहे.