‘बेफिक्रे’ श्रुती हासनची ‘बेधडक’ कबुली, बॉडी शेमिंग करणा-यांना दिले सणसणीत उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 13:22 IST2020-02-28T13:20:13+5:302020-02-28T13:22:06+5:30
बॉडी शेमिंग करणा-यांवरलिहिली पोस्ट

‘बेफिक्रे’ श्रुती हासनची ‘बेधडक’ कबुली, बॉडी शेमिंग करणा-यांना दिले सणसणीत उत्तर
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला. पण यापैकी काही मोजक्याच अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केल्याची कबुली देण्याची हिंमत दाखवली. सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन त्यापैकीच एक़ श्रुतीने प्लास्टिक सर्जरीने अख्खा चेहरामोहरा बदलला. यावरून ती अनेकदा ट्रोलही झाली. आता बॉडी शेमिंग करणा-यांवर एक लांबलचक पोस्ट लिहून तिने सणसणीत उत्तर दिले आहे. शिवाय हो, मी प्लास्टिक सर्जरी केली आणि हे सांगताना मला कुठलीही लाज वाटत नाही, असेही श्रुतीने म्हटले आहे.
2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला. पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत.
श्रुती लिहिते,
कधी लोकांना मी खूप लठ्ठ दिसते आणि कधी खूप सडपातळ असल्याचे लोक म्हणतात. अशा लोकांच्या म्हणण्यानुसार मी वागू शकत नाही. मी जे बोलतेय, त्यावर अनेक महिला सहमत असतील, असा मला विश्वास आहे. बहुतांश वेळा मी मानसिक व शारिरीकदृष्ट्या हार्मोन्सच्या कृपेवर अवलंबून असते. गेल्या अनेक वर्षांपासून मी यावर काम करतेय. शारिरीक बदल सोपा नाही. पण हो, या बदलावर बोलणे मात्र माझ्यासाठी सोपे आहे. हे माझे आयुष्य आहे, हा माझा चेहरा आहे आणि हो, मी प्लास्टिक सर्जरी केलीय. हे सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही. मी प्लास्टिक सर्जरी प्रमोट करतेय किंवा मी याच्याविरोधात आहे, असे काहीही नाही. ही आयुष्य जगण्याची माझी पद्धत आहे. शरीराचे आणि मनाचे बदल स्वीकारून आपण स्वत:वर व इतरांवर उपकार करू शकता. प्रेम वाटा आणि आनंदाने जगा, असे श्रुतीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.