श्याम बेनेगल यांनी २८ दिवसातच पूर्ण केलं होतं 'त्या' सिनेमाचं शूट, काय आहे तो किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:07 IST2024-12-24T13:07:09+5:302024-12-24T13:07:53+5:30
कोणता आहे तो सिनेमा आणि काय आहे तो किस्सा वाचा.

श्याम बेनेगल यांनी २८ दिवसातच पूर्ण केलं होतं 'त्या' सिनेमाचं शूट, काय आहे तो किस्सा?
भारतीय सिनेसृष्टी म्हटलं की आपसूकच नाव येईल ते फिल्ममेकर श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचं. 'मंथन', 'झुबैदा', 'अंकुर' यांसारखे एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी दिले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. काल श्याम बेनेगल यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. समांतर सिनेमा पडद्यावरुन हरपला आहे. श्याम बेनेगल यांनी एक सिनेमा चक्क २८ दिवसातच शूट केला होता. कोणता आहे तो सिनेमा आणि काय आहे तो किस्सा वाचा.
१९८३ साली आलेला 'मंडी' सिनेमा अनेकांच्या लक्षात असेलच. शबाना आजमी, रत्ना पाठक आणि स्मिता पाटील या दिग्गज अभिनेत्री सिनेमात होत्या. हा सिनेमा सलग २५ आठवडे थिएटरमध्ये चालला होता. यावर्षीच 'अनफिल्टर्ड विद समदिश'ला दिलेल्या मुलाखतीत श्याम बेनेगल यांनी मंडी सिनेमाचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, "मी असेच सिनेमे बनवले जे मला बनवायचे होते. थिएटरमध्ये १०० आठवड्यांपेक्षा जास्त दिवस सिनेमा चालावा असं काही करण्याचा माझा कधीच विचारही नव्हता. काही वर्षांपूर्वी मी मंडी सिनेमा बनवला होता तो सिल्व्हर ज्युबिलीपर्यंत चालला. त्या सिनेमात सर्वच माझे आवडीचे कलाकार होते. अमरीश, ओम, नसीरुद्दीन, शबाना, स्मिता होते. हैदराबादमध्ये आम्ही शूटिंग केलं. हे फार मजेशीर आहे कारण आम्ही काहीही विचारविनिमय न करता काम करत होतो. सगळं आपोआपच घडत होतं. एकदा का काम सुरु झालं की चालतच राहायचं कारण सगळेच दमदार कलाकार होते. मी ४५ दिवसांचं शेड्युल बनवलं होतं कारण मी साधारणपणे बिना ब्रेक शूटिंग करतो. पण आम्ही हा सिनेमा केवळ २८ दिवसातच पूर्ण केला. शूट पूर्ण झाल्यानंतर मी म्हणालो आता बास. मला हे फारच भयानक वाटलं होतं."
हा सिनेमा लेखक गुलाम अब्बास यांची उर्दू शॉर्ट स्टोरी 'आनंदी'वर आधारित होता. यामध्ये शहरात असलेल्या वेश्लायलयाची कहाणी होती. सिनेमाला बेस्ट आर्ट डायरेक्शनचा पुरस्कार मिळाला होता.