‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:01 IST2019-04-22T14:00:34+5:302019-04-22T14:01:05+5:30
होय, झोया अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी एक नवा चित्रपट बनवू इच्छितात. या नव्या चित्रपटात केवळ एम सी शेरची कथा असेल.

‘गली बॉय’चा एम सी शेर पुन्हा करणार धूम! येणार नवा चित्रपट!
झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ हा यंदाचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. ‘गली बॉय’मध्ये मुराद आणि सफीनाची भूमिका वठवणारे रणवीर सिंग व आलिया यांना पाहतांना प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेत. केवळ हे दोघेच नाही तर चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचे मन जिंकले. अर्थातच याचे सगळे श्रेय जाते ते झोया अख्तरला. जोयाने प्रत्येक पात्र आणि त्याभोवतीची कथा अशी काही गुंफली की, सगळे या चित्रपटाच्या मोहात पडले. विशेषत: या चित्रपटातील एम सी शेरच्या भूमिकेत दिसलेल्या सिद्धांत चतुर्वेदीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. त्याच्या भूमिकेचे अपार कौतुक झाले. खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनीही पत्र पाठवून त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. हे सगळे बघून की काय, मेकर्सने आता एम सी शेरवर एक वेगळा चित्रपट बनवण्याची तयारी चालवली असल्याचे कळतेय.
होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, झोया अख्तर आणि निर्माता रितेश सिधवानी एक नवा चित्रपट बनवू इच्छितात. या नव्या चित्रपटात केवळ एम सी शेरची कथा असेल. त्याचा अख्खा प्रवास यात दाखवला जाईल. मेकर्सला यानिमित्ताने पुन्हा एकदा हिप हॉप संस्कृतीवर एक चित्रपट बनवण्याची संधी मिळेल. साहजिकच, सिद्धांत चतुर्वेदी हाच या चित्रपटाचा हिरो असेल. सिद्धांतच्या चाहत्यांसाठी ही मोठी ट्रिट म्हणायला हरकत नाही.
‘गली बॉय’ या चित्रपटात गरीब-श्रीमंतातील दरी, नात्यांची गुंतागुंत, मैत्री आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता एमसी शेरवर चित्रपट आलाच तर प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात, ते पाहुच.