सिद्धार्थ-शहनाजचा झाला होता साखरपुडा; डिसेंबरमध्ये बांधणार होते लग्नगाठ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 17:15 IST2021-09-04T17:15:25+5:302021-09-04T17:15:53+5:30
Sidharth and shehnaaz:शहनाज आणि सिद्धार्थ या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि डिसेंबर २०२१ मध्ये ही जोडी लग्न करणार होती.

सिद्धार्थ-शहनाजचा झाला होता साखरपुडा; डिसेंबरमध्ये बांधणार होते लग्नगाठ?
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. इतकंच नाही तर सिद्धार्थच्या निधनाचा सगळ्यात जास्त परिणाम अभिनेत्री शहनाज गिलवर झाल्याचं दिसून येत आहे. शहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच ठावूक होती. त्यामुळे हे दु:ख पचवणं शहनाजला शक्य होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दु:खात बुडून गेलेल्या शहनाजचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार होती, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
सध्या सोशल मीडियावर शहनाज आणि सिद्धार्थच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शहनाज आणि सिद्धार्थ या दोघांचा साखरपुडा झाला होता आणि डिसेंबर २०२१ मध्ये ही जोडी लग्न करणार होती. विशेष म्हणजे या दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवातदेखील झाली होती.
लग्नासाठी हॉटेल्सही झाले होते बुक
सूत्रांनुसार, सिद्धार्थ आणि शहनाज कुटुंबाच्या संमतीने लग्न करणार होते. त्यामुळे दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरु झाली होती. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा रंगणार होता. त्यामुळे हॉटेल्सच्या रुमपासून ते बॅक्वेटपर्यंत जवळपास सगळ्याच गोष्टींची बुकिंग झाली होती. सिडनाजचा लग्नसोहळा तीन दिवस चालणार होता. या लग्नसोहळ्याला दोघांच्याही जवळच्या व्यक्ती, मित्रपरिवार आणि कुटुंबीय सहभागी होणार होते, असं म्हटलं जातं.
दरम्यान, सिद्धार्थ-शहनाजच्या लग्नाविषयी त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत अबू मलिकने शहनाजला सिद्धार्थसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. सिद्धार्थने शहनाजसोबत लग्न करावं याविषयी मी सिद्धार्थशी बोलावं अशी गळ शहनाजने मला घातली होती, असं अबू मलिक या मुलाखतीत म्हणाला होता.