सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी, ई-मेलमध्ये सलमान खानचंही नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 12:17 IST2023-03-05T12:13:43+5:302023-03-05T12:17:12+5:30
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचे वडील बलकौर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी, ई-मेलमध्ये सलमान खानचंही नाव
मुंबई-
दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचे वडील बलकौर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी त्यांना एका ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. ई-मेलमध्ये बलकौर सिंग आणि त्यांचे कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोईल गँगचं नाव न घेण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानचेही नाव असल्याचीही माहिती समोर आली आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना एक धमकीचं पत्र आलं होतं, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजस्थानातून आलाय ईमेल
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत पोलिसांना माहिती असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल राजस्थानमधून पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप मौन बाळगलं आहे. पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती देणं टाळलं आहे.
गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी
मुसेवालाच्या वडिलांना धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही अशीच धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतरही लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याबद्दल काही बोलले तर ते त्यांना ठार मारतील, असं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. बलकौर सिंह यांनी प्रत्येक धमकीनंतर आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे.