दिलजीत दोसांंझने गाणं गाताच पंतप्रधान मोदींनीही दिली साथ; गायकाच्या विनम्र स्वभावाने जिंकलं सर्वांचं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:44 IST2025-01-02T11:41:14+5:302025-01-02T11:44:45+5:30
गायक-अभिनेता दिलजीत दोसांझने पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. या भेटीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय

दिलजीत दोसांंझने गाणं गाताच पंतप्रधान मोदींनीही दिली साथ; गायकाच्या विनम्र स्वभावाने जिंकलं सर्वांचं मन
अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ सध्या जगभरात चांगलाच लोकप्रिय आहे. यामागचं कारण म्हणजे दिलजीत सध्या जगभरात दिललूमिनाटी या शोसाठी चर्चेत आहे. जगभरातील प्रेक्षकांना दिलजीत त्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध करत आहे. दिलजीतच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम खास झालीय. कारण दिलजीतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा योग आलाय. दिलजीतने सोशल मीडियावर याविषयी व्हिडीओ - फोटो पोस्ट करुन खास प्रसंग सांगितला आहे.
दिलजीत अन् पंतप्रधान मोदींची भेट
दिलजीतने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत दिलजीतने अत्यंत विनम्रपणे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओत एका क्षणी दिलजीत पंतप्रधान मोदींना गाणं ऐकवताना दिसतो. त्यावेळी मोदी समोर असलेल्या टेबलला वाजवून दिलजीतला साथ देताना दिसतात. "तुमच्या कुटुंबाने तुमचं नाव दिलजीत ठेवलं. तुम्ही लोकांची मनं जिंकत आहात", अशा खास शब्दात नरेंद्र मोदींनी दिलजीत दोसांझचं कौतुक केलंय.
दिलजीत मोदींची भेट घेतल्यावर काय म्हणाला?
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर दिलजीतने X वर या भेटीचा अनुभव सांगितला. दिलजीत म्हणाला की, "२०२५ ची ही शानदार सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली ही भेट ही संस्मरणीय राहील. आम्ही संगीताच्या ऐवजी अनेक विषयांवर गप्पा मारल्या." अशाप्रकारे दिलजीत दोसांझने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी दिलजीतच्या विनम्र स्वभावाने एकमेकांचं मन जिंकलं.