खरंच बप्पी लहरींचा आवाज गेला? वाचा, काय म्हणाले बप्पी दा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:09 AM2021-09-21T11:09:46+5:302021-09-21T11:10:16+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून बप्पी दांच्या प्रकृतीबद्दलची चर्चा सुरू आहे. अशात 69 वर्षांच्या बप्पी दांची प्रकृती बरी नसून त्यांनी आपला आवाजही गमावला असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली.
सर्वांना डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बॉलिवूडचे गोल्डन सिंगर बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचा आवाज गेल्याची बातमी पसरली आणि त्यांच्या चाहत्यांना जोरदार धक्का बसला. चाहते चिंतीत झाले. गेल्या अनेक दिवसांपासून बप्पी दांच्या प्रकृतीबद्दलची चर्चा सुरू आहे. अशात 69 वर्षांच्या बप्पी दांची प्रकृती बरी नसून त्यांनी आपला आवाजही गमावला असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आणि अखेर खुद्द बप्पी लहरी यांच्यावर खुलासा करण्याची वेळ आली.
प्रकृतीबद्दलच्या वेगवेगळ्या या चर्चा पाहता बप्पी लहरी यांनी ट्विट करत खरं काय ते स्पष्ट केलं.
काय म्हणाले बप्पी दा?
आवाज गेल्याची बातमी वाचून बप्पी दा नाराज झालेत. त्यांनी याबद्दल जाहिर नाराजी व्यक्त करत, हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. ‘माझ्या आरोग्याबाबत काही माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि वृत्त ऐकून मला वाईट वाटतंय. चाहते आणि हितचिंतकांच्या आशीवार्दानं मी पूर्णपणे बरा आहे', असं बप्पी दांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.
बप्पी लहरी यांच्या या पोस्टवर तूर्तास कमेंट्सचा पाऊस पडतोय. काही कलाकारही यावर व्यक्त झालेत. गायक शान यानं कमेंट करत आरोग्याबाबतच्या अशा अफवा निराशाजनक असल्याचं म्हणत लोकांना यातून काय आनंद मिळतो? असा संतप्त सवाल केला.
बप्पी लहरी यांचा जन्म 1952 साली कोलकाता येथे झाला होता. त्यांनी 70 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि 80 च्या दशकात लोकांनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं. बंबई से आया मेरा दोस्त,आय एम ए डिस्को डान्सर, जूबी-जूबी,यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे सारखी त्यांची सुपरहिट गाणी आजही लोक गुणगुणत असतात.
बप्पी नेहमी गोल्ड घालून असतात. म्हणून त्यांना ‘गोल्डमॅन’ म्हणूनही ओळखलं जातं. बप्पी एवढं सोनं का घालतात? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. मात्र, याचा त्यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला होता. मी हे केवळ दिखावा करण्यासाठी करतो, असं लोक म्हणतात. पण तसं नाही. सोनं माझ्यासाठी लकी आहे, असं त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.