हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 08:48 AM2024-09-19T08:48:31+5:302024-09-19T08:48:55+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिमेश रेशमियाचे वडील आणि लोकप्रिय संगीतकार विपिन रेशमिया यांचं निधन झालं आहे.
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिमेश रेशमियाचे वडील आणि लोकप्रिय संगीतकार विपिन रेशमिया यांचं निधन झालं आहे. ते ८७ वर्षांचे होते. बुधवारी, १८ सप्टेंबर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फॅशन डिझायनर वनिता थापरने पोस्ट करत विपिन रेशमिया यांच्या निधनाची बातमी दिली आहे. गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी जुहू येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. "मला हे समजल्यानंतर खूप दु:ख होत आहे. २० वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप उत्तम होता. संगीताचं त्यांना उत्तम ज्ञान होतं. फोन करून ते हिमेशला बघ मला ही ट्यून सापडली आहे, असं म्हणायचे. हिमेशलाही ते अनेक वेळा मार्गदर्शन करायचे", असं वनिता थापरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हिमेश त्याच्या वडिलांनाच गुरू मानायचा. वडिलांकडूनच त्याला संगीताचं ज्ञान मिळालं होतं. हिमेशची संगीतातील ओढ पाहूनच विपिनी रेशमिया यांनी त्यांचं संगीतकार होण्याचं स्वप्न मागे सोडलं होतं. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की हिमेशला लहानपणापासूनच संगीतात कल होता. त्याची आवड पाहूनच माझं संगीतकार होण्याचं स्वप्न मी मागे टाकलं होतं असं ते म्हणाले होते.