९९ टक्के लाइव्ह शोमध्ये तुम्हाला गंडवलं जातं...! लोकप्रिय गायकानं केला शॉकिंग खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:33 PM2023-04-12T15:33:57+5:302023-04-12T15:56:51+5:30
Reality Show and Live Concert : रिॲलिटी शो, लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट किती खरे, किती खोटे...?
गायक पलाश सेन (Palash Sen) याने अनेक शानदार गाण्यांना आवाज दिला आहे. अर्थात दीर्घकाळापासून तो लाईमलाईटपासून दूर आहे. पण आता पलाश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिॲलिटी शो आणि लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स आणि कॉन्सर्टबद्दल त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सध्याचे ९९ टक्के लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स हे फेक असल्याचं त्याने म्हटलंय.
द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत पलाशने अनेक उदाहरणं देत भारतीय म्युझिक इंडस्ट्रीचा पर्दाफाश केला. प्रेक्षकांची कशी दिशाभूल केली जाते, ते त्याने सांगितलं.
काय म्हणाला पलाश?
पलाशने Dannii Minogueचं उदाहरण देत सांगितलं की, डॅनीचा ऑस्ट्रेलियात लाईव्ह शो होता. प्रचंड गर्दी होती. पण ती लाईव्ह गात नसून फक्त लिपसिंक करत असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात आलं आणि लोकांनी तिला अंडी फेकून मारली होती. भारतात लोकांना काय खोटं, काय खरं कळेल तेव्हा ही स्थिती बदलेल. अरिजीत सिंग, सोनू निगम, शंकर महादेवन, दलेर मेहंदी, सुनिधी चौहान असे काही सिंगर लिप सिंक न करता लाईव्ह गातात. पण उर्वरित ९९ टक्के सिंगर फक्त रेकॉर्ड केलेले ट्रॅक वाजवतात. मी त्यांची नावं सांगणार नाहीत. पण हे दुर्दैवी आहे. हे फक्त भारतात होतंय असं नाहीये. जगभरात होतंय. प्रेक्षकांची दिशाभूल करणारे हे सिंगर स्वत:शीच प्रामाणिक नाहीत. यापेक्षा आणखी काय सांगावं...? असं पलाश म्हणाला.
रिॲलिटी शो केल्याचा पश्चाताप...
रिॲलिटी शोची रिॲलिटीही त्याने सांगितली. तो म्हणाला, मी रिॲलिटी शो केलेत, पण याचा मला पश्चाताप होतो. तिथे इतकी स्क्रिप्टींग असते की विचारूच नका. हे सगळे रिॲलिटी शो फेक असतात. रिॲलिटीच्या नावावर तिथे काहीच रिॲलिटी नसते. या शोमध्ये कुठल्याजही इमोशन्स नसतात. तो फक्त एक टीव्ही शो आहे आणि सास भी कभी बहू थी सारखा तो पाहायला हवा. एक रिॲलिटी शो जज करताना मी राजा हरिचंद्र बनण्याचा प्रयत्न केला आणि माझा दलेर पाजीसोबत वाद झाला. ते स्क्रिप्टचं पालन करायचे आणि मी सत्यासाठी लढत होतो.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मिनी माथुरनं रिॲलिटी शोचा पर्दाफाश केला होता. इंडियन आयडॉल या रिॲलिटी शोचे ६ सीझन तिने होस्ट केले होते. त्यानंतर तिनं शो सोडला. अलीकडे एका पॉडकास्टमध्ये ती यावर बोलली होती. पूर्वी शोमध्ये स्पर्धकांवर लक्ष केंद्रित केलं जायचं, पण नंतर बळजबरीने शो क्रिएट केले जातात, असं ती म्हणाली होती.