Video: दुबईच्या पावसात अडकला राहुल वैद्य; पाण्यातून वाट काढत म्हणाला, 'हबीबी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:17 IST2024-04-17T14:05:00+5:302024-04-17T14:17:13+5:30
गायक राहुल वैद्यचे दुबईत हाल, बघा Video

Video: दुबईच्या पावसात अडकला राहुल वैद्य; पाण्यातून वाट काढत म्हणाला, 'हबीबी...'
Dubai Rains: दुबईत सध्या पावसाने थैमान घातलं आहे. ठिकठिकाणी पाणी साचून दुबईही तुंबली आहे. पावसाळ्यात मुंबईत जसं चित्र असतं तशीच परिस्थिती सध्या दुबईत पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर गाड्या अडकून पडल्या आहेत. दुबईच्या पावसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान भारतीय गायक राहुल वैद्यही (Rahul Vaidya) दुबईत अडकला आहे. हातात शूज घेऊन पाण्यातून वाट काढत जातानाचा त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
राहुल वैद्य काही दिवसांपासून दुबईत होता. सुरुवातीचे काही दिवस एन्जॉय केल्यानंतर काल मात्र त्याने दुबईच्या भयानक पावसाचा अनुभव घेतला. 2008 नंतर दुबईत पहिल्यांदाच इतक्या तीव्र स्वरुपाचा पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी साचलं होतं. गाड्या बंद पडल्या होत्या. भर दुपारीही दुबईत काळोख झाला होता. अनेक विमानंही रद्द करण्यात आली. राहुलचं कोलकातासाठी विमान होतं ते वेळेत निघालं म्हणून त्याने देवाचे आभार मानले. दुबईतल्या सर्व परिस्थितीचे व्हिडिओ त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.
राहुल वैद्यच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्यात. 'हे लोक मुंबईपासून कितीही दूर गेले तरी मुंबई यांच्यापासून दूर जात नाही', 'मुंबईकरांसाठी हे सामान्य आहे','बीएमसी दुबईत पोहचत आहे'. तर काहींनी दुबईतल्या विकासाचीही खिल्ली उडवली.