"५ वर्षांची मुलगी जेव्हा चिकनी चमेली गाते तेव्हा लाज वाटते.."; श्रेया घोषाल स्वतःच्याच गाण्याबद्दल असं का म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:47 IST2025-02-26T16:45:16+5:302025-02-26T16:47:30+5:30
Shreya Ghoshal Embarrassed on Chikni Chameli: गायिका श्रेया घोषालने चिकनी चमेली गाण्याबद्दल खंत व्यक्त करत तिच्या मनातील भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत

"५ वर्षांची मुलगी जेव्हा चिकनी चमेली गाते तेव्हा लाज वाटते.."; श्रेया घोषाल स्वतःच्याच गाण्याबद्दल असं का म्हणाली?
श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका. श्रेयाने आजवर हिंदीसोबतच मराठी गाणीही गायली आहेत. श्रेयाने गायलेली गाणी आज अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असतील यात शंका नाही. श्रेया आजवर कोणत्याही वादात अडकली नाही. श्रेयाने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या एका गाण्याबद्दल खंत व्यक्त केली. हे गाणं म्हणजे 'चिकनी चमेली'. (chikni chameli) 'अग्नीपथ' सिनेमातील हे गाणं आजही सुपरहिट आहे. परंतु श्रेयाला या गाण्याबद्दल आज वाईट का वाटतंय, याचा खुलासा तिने केलीय.
श्रेयाला का वाटते चिकनी चमेली गाण्याची लाज?
श्रेयाने एका मुलाखतीत सांगितलं की, "चिकनी चमेली सारखी महिलांच्या बाबतीत सीमारेषा आखणारी गाणी मी गायली आहेत. महिलांना सेक्सी याशिवाय त्यांना एका विशिष्ट रुपात लोकांसमोर प्रेझेंट करणं तर दुसरीकडे त्या सामान्य महिला आहेत हे दर्शवणं या दोन गोष्टींमध्ये एक नाजूक धागा असतो. मी सध्या या गोष्टींबद्दल जास्त जागरुक का झाली आहे? कारण मी जेव्हा लहान मुलींना चिकनी चमेलीसारखं गाणं गाताना बघते तेव्हा त्यांना त्या शब्दाचा अर्थ माहित नसतो."
"चिकनी चमेली गाणं मजेशीर आहे. या गाण्यावर त्या मुली डान्स करतात आणि माझ्याकडे येऊन सांगतात की, आम्ही हे गाणं तुमच्यासमोर गाऊन दाखवू का? त्यावेळी ५-६ वर्षांची ती लहान मुलगी चिकनी चमेली गाण्यातले शब्द गाणार म्हणून मला लाज वाटते. ते तिच्यासाठी योग्य नाही, हे ऐकणंही बरोबर नाही, मला हे नकोय."
"मी जेव्हा एखादं गाणं गाते तेव्हा मी किती सेक्सी आहे, किती कामुक आहे या गोष्टीचा आनंद गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करणं बरोबर नाही. मी याविषयी सध्या खूप जागरुक आहे. त्यामुळे गाणं असं वेगळ्या अर्थाने लिहिलं नाहीये ना? हे मी बघते. जर कोणी महिलेने अशा प्रकारचं गाणं लिहिलं तर ती जरा सभ्य भाषेत गाण्याचे शब्द लिहेल. एखादी स्त्री असं गाणं वेगळ्या पद्धतीने लिहू शकते. तो फक्त दृष्टीकोनाचा भाग आहे. आपल्या समाजात अन् विशेषतः भारतात अशा प्रकारचा बेंचमार्क सेट करणं आवश्यक आहे. कारण आपलं संगीत आणि गाण्यांचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो."