प्रियंका चोप्राचे कमबॅक अन् झायरा वसीमचे अलविदा...पाहा The Sky is Pink चा Trailer
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:40 PM2019-09-10T12:40:07+5:302019-09-10T12:41:22+5:30
‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारणही तसेच खास आहे.
‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारणही तसेच खास आहे. एक म्हणजे, प्रियंका चोप्राचा हा कमबॅक सिनेमा आहे. तर झायरा वसीमचा शेवटचा चित्रपट.
होय, प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये बिझी झाली आणि बॉलिवूड चित्रपटांपासून दुरावली. पण आता सुमारे तीन वर्षांनंतर प्रियंका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतली आहे. त्याअर्थाने ‘स्काय इज पिंक’ हा तिचा कमबॅक सिनेमा आहे. झायरा वसीमचे म्हणाल तर, तिने बॉलिवूडला कायमचे अलविदा म्हटले आहे.
धर्माच्या नावावर झायराने अगदी तडकाफडकी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती. अर्थात त्याआधी ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले होते. त्यामुळे ‘स्काय इज पिंक’ हा तिचा शेवटचा चित्रपट असणार आहे.
‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. प्रियंकाने यात एका टीनेजर मुलीच्या आईची भूमिका साकारली आहे. झायरा यात टीनेजर मुलीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये एक भावनिक कथा सूत्र पाहायला मिळते. एकीकडे प्रियंका आणि फरहान अख्तरची प्रेमकहाणी आणि दुसरीकडे त्यांच्या मुलीला झालेला दुर्मिळ आजार अशी ही कथा आहे.
मुलीच्या आजारापणाबद्दल प्रियंका व फरहानला समजते तेव्हा तिच्या उपचारासाठी दोघांचा संघर्ष सुरु होतो. यादरम्यान नवरा-बायकोच्या नात्यात आलेला दुरावा, वाद असे सगळे काही यात आहे. मुलगी हेच विश्व असलेल्या प्रियंकाने यात एका खंबीर आईची भूमिका साकारली आहे.
सोनाली बोस हिने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात मोटिव्हेशन स्वीकर आयशा चौधरी आणि तिच्या पालकांची सत्य कथा दाखवण्यात आली आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.