"उगाच मला बदनाम केले जात आहे",अभिनेत्याने लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:40 PM2021-03-05T18:40:31+5:302021-03-05T18:43:53+5:30
स्लमडॉग मिलेनियर या सिनेमात सलीम मलिकची भूमिका वठवणा-या मधूर मित्तलने लोकांना एका पक्षाचे ऐकून निष्कर्षावर पोहोचू नका, अशी अपील केली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या सिनेमात काम करणारा अभिनेता मधूर मित्तल विरोधात लैंगिक अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. १३ फेब्रुवारी रोजी मधुरने एक्स गर्लफ्रेंडच्या घरी जात मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं होतं, मात्र यावर मौन न बाळगता मधुरने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. त्याची प्रचंड बदनामी झाल्याचे मधूरचे म्हणणे आहे. खोट्या गोष्टी सांगून ज्या गोष्टी घडल्या नाही त्याही सांगितल्या जात आहे. मात्र या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यावर प्रचंड वाईट परिणाम होत आहेत.
मला काम मिळणेही बंद झाले आहे. माझ्या घरात मी एकटाच कमावणारा आहे. चुकीच्या बातम्यांमुळे माझ्यासोबत माझ्या कुटुंबावरही त्याचा परिणा होत आहे’ असे त्याने म्हटले आहे. स्लमडॉग मिलेनियर या सिनेमात सलीम मलिकची भूमिका वठवणा-या मधूर मित्तलने लोकांना एका पक्षाचे ऐकून निष्कर्षावर पोहोचू नका, अशी अपील केली आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल, असेही त्याने विश्वास व्यक्त केला आहे.
नेमके काय आहे प्रकरण
मधूर आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची भेट डिसेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच मधूरने मद्याच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर दोघांचे ब्रेकअपही झाले होते. मात्र मधूरने गर्लफ्रेंडला त्रास देणे थांबवले नसल्याचे म्हटले जात आहे. मधूरने घरात घुसून तिला मारहाण केली, असे तरुणीच्या वकिलांनी सांगितले. सेच तिचे केस, कान ओढले. तिच्या डोळ्यांवर त्याने मुक्का मारला, असे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.