बाॅक्स ऑफिसवर छोटा पॅकेट, बडा धमाका...; स्मॉल बजेट चित्रपटांचे नेत्रदीपक यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 01:00 PM2023-05-15T13:00:17+5:302023-05-15T13:01:19+5:30
१५ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ ने ३४० कोटी आणि १६ कोटी रुपये बजेट असलेल्या ‘कांतारा’ ने ४५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतीय सिनेसृष्टीतील स्मॉल बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश मिळवले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ पाठोपाठ स्मॉल बजेट ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपटही १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. यंदा एकूण नऊ भारतीय चित्रपट १०० कोटींचे मनसबदार बनले आहेत.
१५ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘द कश्मीर फाईल्स’ ने ३४० कोटी आणि १६ कोटी रुपये बजेट असलेल्या ‘कांतारा’ ने ४५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
५ मे रोजी रिलीज झालेल्या वादग्रस्त ‘द केरल स्टोरी’ वर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने १० दिवसांमध्ये ११२ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला आहे. आजही हा चित्रपट सर्वत्र गर्दी खेचत असल्याने आणखी काही दिवस बॉक्स ऑफिसवरील ‘द केरळ स्टोरी’ चे वादळ शमणार नसल्याचे चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बिग बजेटही हिट
या जोडीला आणखी आठ बिग बजेट चित्रपट यंदा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. यात ‘वॉल्टेयर वीरैया’, ‘थुनिवू’, ‘वारिसू’, ‘पोन्नियिन सेल्वन २’ या दाक्षिणात्य, तर ‘पठाण’, ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘भोला’ या हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी ‘किसी का भाई किसी की जान’ व ‘भोला’ हे चित्रपट साऊथचे रिमेक असल्याने भारतीय चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचा वरचष्मा असल्याचे चित्र पाहायला मिळते.