'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना; सावळया रंगामुळे झाली बऱ्याचदा रिजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:02 PM2024-02-27T15:02:16+5:302024-02-27T15:02:47+5:30
Bollywood actress: या अभिनेत्रीने एक हजारपेक्षा जास्त वेळा ऑडिशन दिले. मात्र, प्रत्येक वेळी तिच्या रंगामुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं.
बॉलिवूडमध्ये आलेल्या कोणत्याही कलाकाराला स्ट्रगल चुकलेला नाही. त्यातही तो आऊटसायडर असेल तर त्यांना काम मिळवण्यापासून ते हक्काचं स्थान निर्माण करेपर्यंत बराच संघर्ष करावा लागतो. बाहेरुन आलेल्या या नवख्या कलाकारांना मार्गदर्शन करणारा किंवा त्यांचा कोणी गॉडफादर नसतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना सिनेमात काम मिळवणं कठीण होतं. यामध्येच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या स्ट्रगल काळावर भाष्य केलं आहे. यात आऊट साइडर असल्यामुळे इंडस्ट्रीत त्यांना त्यांच्या रंगरुपावरुन कसं हिणवलं गेलं, कसं सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवलं यावर भाष्य केलं आहे. यामध्येच लोकप्रिय अभिनेत्री शुभिता धुलिपाला हिने तिच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.
शोभिताला कलाविश्वात तिचं स्थान निर्माण करण्यासाठी बराच स्ट्रगल करावा लागला. एक हजारपेक्षा जास्त वेळा तिने ऑडिशन्स दिले. यात अनेकदा तिच्या वाट्याला रिजेक्शन आलं. मात्र, तिने हार मानली नाही. या सगळ्या प्रवासावर तिने भाष्य केलं आहे. सोबतच तिच्या स्कीन टोनमुळे अनेकदा तिला नकार मिळाला, असंही तिने यावेळी सांगितलं.
"माझा कलाविश्वाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. त्यामुळे ऑडिशन देणं हाच माझा कलाविश्वातील एंट्री पॉइंट होता. मी सुरुवातीला मॉडलिंगपासून सुरुवात केली. एक मॉडल असल्याकारणाने अनेक जाहिरातींसाठी ऑडिशन्स दिले. तीन वर्ष मी ऑडिशन देत होते. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी १ हजारपेक्षा जास्त वेळा ऑडिशन दिले आहेत", असं शोभिता म्हणाली.
स्किन टोनमुळे करावा लागला रिजेक्शनचा सामना
शोभिताची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्कीन टोनमुळे कशाप्रकारे रिजेक्शन सहन केलं हे सांगितलं. "ज्यावेळी तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करता त्यावेळी तुमच्यासाठी ती लढाईच असते. माझं बॅकग्राऊंड सिनेमाचं नाही. त्यामुळे मी सुरुवातीला जाहिराती करायचे. त्यावेळी अनेकदा मला माझ्या रंगावरुन रिजेक्ट केलं गेलं आहे. मी गोरी नाही," असं स्पष्ट सांगितलं जायचं. एकदा तर मला, 'जसं जाहिरातीमध्ये पाहिजे तितकी तू सुंदर दिसत नाहीस, असं मला तोंडावर सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, २०१० मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या शोभिताने २०१५ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यापूर्वी ती मॉडलिंग करायची. अनुराग कश्यप यांच्या रमन राघव 2.0 या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर ती अॅमेझॉन प्राइमच्या मेड इन हेवन मध्ये लीड रोलमध्ये झळकली.विशेष म्हणजे हळूहळू तिच्या करिअरचा आलेख उंचावत आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 1' आणि 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये झळकली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. शोभिता लवकरच हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.