रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 10:33 AM2019-08-23T10:33:14+5:302019-08-23T10:40:48+5:30
रेल्वे स्थानकावर गात भीक मागणारी ‘रानू दी’ थेट स्टुडिओत पोहोचली आणि तिने बॉलिवूडसाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले.
पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणे गात उदरनिर्वाह करणा-या रानू मंडाल अर्थात ‘रानू दी’चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. रेल्वे स्थानकावर गात भीक मागणारी ‘रानू दी’ थेट स्टुडिओत पोहोचली आणि तिने बॉलिवूडसाठी पहिले गाणे रेकॉर्ड केले. गायक, संगीतकार हिमेश रेशमियाने तिला पहिला ब्रेक दिला. होय, हिमेशच्या आगामी चित्रपटासाठी ‘रानू दी’ने गाणे रेकॉर्ड केले. हिमेशने तिच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओत ‘रानू दी’ तिच्या जादुई आवाजात गाणे गाताना दिसत आहे. तिच्या बाजूला हिमेश उभा आहे. ‘तेरी मेरी कहानी’असे ‘रानू दी’ने रेकॉर्ड केलेल्या गाण्याचे बोल आहेत. हिमेशचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हार्डी और हिर’ या चित्रपटात हे गाणे असणार आहे.
लवकरच ‘रानू दी’ रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’मध्येही दिसणार आहे. हिमेश या शोचा जज आहे. बाबू मंडल यांच्याशी रानू यांचा विवाह झाला होता. मात्र, पतीच्या निधनानंतर त्या रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन लोकांचा मनोरंजन करत आपली भूक भागवत होत्या. काही दिवसांपूर्वी ‘रानू दी’ रेल्वे स्टेशनवर गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘एक प्यार का नगमा है.. ’ हे गाणं गातांना दिसली होती.
एका व्यक्तिने तिचा गातानाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, रानू एका रात्रीत स्टार झाली. या व्हिडीओ तिचे आयुष्यच बदलून टाकले. म्युझिक कंपन्यांचीही नजर त्यांच्यावर पडली. कोलकाता, मुंबई, केरळ, बांग्लादेश येथून रानू मंडाल यांना गाण्यासाठी प्रस्ताव येऊ लागले.
नुकताच रानू यांचा मेकओव्हर करण्यात आला होता. त्यांच्या मेकओव्हरचे फोटोही व्हायरल झाले होते.