पोलीस हवालदाराचा मुलगा बनला सुपरस्टार, आता आहे कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:04 PM2021-08-23T18:04:38+5:302021-08-23T18:04:57+5:30
आजच्या घडीला इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत या अभिनेत्याच्या नावाचादेखील सामावेश आहे.
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार चिरंजीवीने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. चिरंजीवी यांनी आपल्या हटके अभिनयाने एक आदर्श निर्माण केलाय. दमदार आवाजात डायलॉग बोलण्याच्या स्टाइलमुळे ते ओळखले जातात. त्यांच्यासोबत काम केलेले सहकलाकार त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.
अभिनेते चिरंजीवी यांची लोकप्रियता केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर ते एक उत्तम चित्रपट निर्माते आणि एक थिएटर आर्टिस्ट देखील आहेत. त्यांचा पहिला टॉलिवूड चित्रपट १९७८ मध्ये रिलीज झाला. पहिल्या चित्रपटापासून चिरंजीवी ऑल राउंडर होते. त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. चिरंजीवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. इतकंच नव्हे तर आजच्या घडीला इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत चिरंजीवी यांच्या नावाचादेखील सामावेश आहे.
चिरंजीवी यांचा जन्म २२ ऑगस्ट १९५५ रोजी आंध्र प्रदेशातील मोगालथुरमध्ये झाला. चिरंजीवी यांचे वडील एक पोलीस हवालदाराची नोकरी करत होते. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती जेमतेम होती. पण आता ते कोट्यावधींच्या मालमत्तेचे मालक आहेत.
Caknowledge.com च्या अहवालानुसार चिरंजीवी आजच्या घडीला १५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. चिरंजीवी केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनदेखील कमाई करत असतात. चित्रपटात अभिनय करण्याच्या फीस व्यतिरिक्त ते चित्रपटाच्या एकूण नफ्यामधूनही काही हिस्सा घेत असतात. एका ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी देखील ते भरमसाठ फीस घेत असतात. ते दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सर्वाधिक करदात्यांपैकी एक आहेत.
चिरंजीवी हे हैदराबादमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या आलिशान बंगल्याची किंमत सुमारे २८ कोटी इतकी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंगळुरूमध्ये आणखी एक नवीन घर खरेदी केल्याची चर्चा आहे. चिरंजीवी यांना वेगवेगळ्या आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हर आणि रोल्स रॉयस अशी अनेक वाहने आहेत. त्यांच्या कारची किंमत सुमारे एक ते तीन कोटींच्या घरात आहे. रोल्स रॉयस ही कार त्यांना त्यांचा मुलगा राम चरण याने भेट दिली होती.
चिरंजीवी यांनी २००८ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आंध्र प्रदेशात प्रजा राज्यम हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी पक्षाच्या प्रारंभावेळी म्हटलं होतं, की त्यांच्या पक्षाचा मुख्य मुद्दा सामाजिक न्याय हा असणार आहे.