'माझा सहभाग नाही', सोनाक्षी सिन्हा-इकबालच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ लव सिन्हाची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 18:09 IST2024-06-11T18:08:22+5:302024-06-11T18:09:23+5:30
वडिलांनंतर भावानेही प्रतिक्रिया नाकारली, सोनाक्षीच्या निवडीवर कुटुंबीय नाराज?

'माझा सहभाग नाही', सोनाक्षी सिन्हा-इकबालच्या लग्नाच्या चर्चांवर भाऊ लव सिन्हाची प्रतिक्रिया
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि बॉयफ्रेंड जहीर इकबाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र लेकीच्या लग्नाची बातमी कुटुंबालाच माहित नाहीए. शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रतिक्रियेनंतर आता सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हाचीही कमेंट आली आहे. २३ जून रोजी सोनाक्षी आणि इकबाल लग्नबंधनात अडकणार का यावर लव सिन्हाने प्रतिक्रिया दिली आहे.
ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, लव सिन्हा म्हणाला, "मी सध्या मुंबईबाहेर आहे. सोनाक्षीबद्दल जे छापून येत आहे त्यात माझा काहीही सहभाग नाही. मी आताच यावर काहीही बोलणार नाही."
तर झूमशी बातचीत करताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "मी सध्या दिल्लीत आहे. निवडणूकांनंतर मी इथेच आलो. माझ्या मुलीच्या प्लॅनबद्दल माझं कोणाशी काहीच बोलणं झालेलं नाही. तुम्ही विचारत आहात की ती लग्न करणार आहे का तर तिने अद्याप मला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मी माध्यमातच हे वाचत आहे. आजकाल मुलं आईवडिलांची परवानगी घेत नाही तर सरळ निर्णय सांगतात. ती कधी सांगते याची मीही वाट पाहत आहे."
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या महिन्यात 23 तारखेला दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. मोजक्या पाहुण्यांमध्येच हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सलमान खान या लग्नात नक्कीच असणार आहे कारण त्यानेच दोघांची भेट घडवून आणली होती.