"स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते...", असं का म्हणाली सोनाली बेंद्रे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 10:09 IST2025-02-28T10:08:12+5:302025-02-28T10:09:05+5:30
सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत सादर केली 'ही' कविता, नंतर राज आणि शर्मिला ठाकरेंची भेटही घेतली.

"स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते...", असं का म्हणाली सोनाली बेंद्रे?
काल २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनसेकडून शिवाजी पार्क येथे अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. याचंच काल उद्घाटन झालं. यासाठी आशा भोसले, जावेद अख्तर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, विक्की कौशल, लक्ष्मण उतेकर, शर्वरी वाघ या कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रत्येकाने स्टेजवर येत एक मराठी कविताही सादर केली. या कलाकारांमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेही (Sonali Bendre) उपस्थित होती. राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे अनेक वर्षांनी एकत्र दिसले. यावेळी सोनालीने मराठी भाषेबद्दल काय म्हणाली आणि तिने कोणती कविता सादर केली वाचा
सोनाली बेंद्रने स्टेजवर येत मराठीतून भाषण करत सर्वांचं मन जिंकलं. ती म्हणाली, "नमस्कार! आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसमोर मी उभी आहे. माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली देते. मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जन्म जरी बेद्रेंची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता पूर्ण लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो.
पण या सगळ्यात एक गोष्टीत कोणतीही तडजोड नव्हती तो म्हणजे आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी झाले तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे १०० टक्के महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे. सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशीही फारशी गोडी लागली नाही. नंतर हिंदी चित्रपटात आले. तिथेही मराठी लेखन, वाचन कमीच झालं. तरी काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत. तर ती मनाची अवस्था आहे. जगण्याचं दृष्टिकोन आहे. जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला तुमच्यासमोर ही कविता सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या शब्दात नक्कीच घर करतील."
या कार्यक्रमात सर्वच कलाकारांनी दिग्गज कवींच्या एक एक कविता सादर केल्या. त्यामुळे या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने काल मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी या दोघांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.