'अंडरवर्ल्डमुळे मला अनेक चित्रपट सोडावे लागले'; सोनाली बेंद्रेने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 02:01 PM2022-06-27T14:01:54+5:302022-06-27T14:03:37+5:30
Sonali bendre: सोनालीने नुकतीच 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा कलाविश्वावर कसा दबाव होता हे सांगितलं.
९०च्या काळात अनेक तरुणांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोनाली प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर सोनाली पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाली असून द ब्रोकेन न्यूज ही तिची वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या सीरिजच्या निमित्ताने सोनाली सध्या चर्चेत येत आहे. यामध्येच अलिकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ९०चा काळ आणि अंडरवर्ल्ड यांचा कसा संबंध होता यावर भाष्य केलं आहे.
सोनालीने नुकतीच 'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ९० च्या दशकात अंडरवर्ल्डचा कलाविश्वावर कसा दबाव होता हे सांगितलं. इतंकच नाही तर अंडरवर्ल्डमुळे तिला अनेक चित्रपट सोडावे लागले असंही तिने सांगितलं.
"त्याकाळात एखाद्या कलाकाराला अंडरवर्ल्डमधून फोन येणं ही फार साधारण गोष्ट होती. अंडरवर्ल्ड कलाविश्वात सतत आणि बेधडकपणे हस्तक्षेप व्हायचा. अनेक चित्रपटांवर बेकायदेशीरित्या पैसे लावले जायचे. जर तुम्ही या कामात त्यांना साथ दिली नाही, तर तुम्हाला एकही चित्रपट मिळणार नाही हे समजून जा", असं सोनाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्याकाळात मी आणि गोल्डी एकमेकांना डेट करत होतो. गोल्डी फिल्ममेकर आहेत त्यामुळे कोणत्या चित्रपटांवर अंडरवर्ल्ड पैसे लावतात याची कल्पना त्यांना होती. त्यामुळे गोल्डी मला अनेकदा या गोष्टी सांगायचे ज्यामुळे मला असे कितीतरी चित्रपट सोडावे लागले. त्या काळात चांगले चित्रपट सोडल्याचं आजही मला वाईट वाटतं."
दरम्यान, "अनेकदा अंडरवर्ल्डच्या दबावामुळे अनेक अभिनेत्रींना चित्रपटात रिप्लेस केलं जायचं. त्यामुळे माझ्यावर दबाव आहे आणि मी काहीच करु शकत नाही. प्लीज तुम्ही समजून घ्या", असं दिग्दर्शक फोन करुन कलाकारांना सांगायचे. सोनालीने या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनालीकडे पाहिलं जातं. 'दिलजले', 'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'जिस देस मैं गंगा रहता है' अशा अनेक हिंदीसह साऊथ चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.