सोनाली बेंद्रेच्या तब्येतीविषयी तिचे पती गोल्डी बेहलने दिली ही माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:13 PM2018-08-03T12:13:00+5:302018-08-03T12:16:21+5:30
सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला असून ती सध्या त्यावर उपचार घेत आहे. सोनालीची कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून तिने दिली होती. सोनालीने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहित ही गोष्ट तिच्या चाहत्यांना सांगितली होती. सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. सोनालीची तब्येत चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे.
इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिअॅलिटी शोची सोनाली बेंद्रे परीक्षक होती. मात्र खाजगी कारणांमुळे सोनालीने हा शो सोडला. तिच्याऐवजी अभिनेत्री हुमा कुरेशी हा शो करत आहे. कॅन्सरमुळेच तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तिने हा कार्यक्रम सोडल्यानंतर तिने काही दिवसांनंतर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटले होते की, कधी कधी आयुष्यात अनपेक्षित वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीही विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराविरोधात लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. सतत शारीरिक वेदना होत असल्याने काही वैद्यकीय तपासण्या केल्या. यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या आजाराला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत''.
सोनाली बेंद्रेने १९९४ साली बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. 'आग' सिनेमाच्या माध्यमातून तिने इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. सोनालीने बॉलिवूडला एका पेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. 'सरफरोश' सिनेमासाठी सोनालीला IIFA अवॉर्ड्समध्ये बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्डने तिला गौरवण्यातही आले आहे. केवळ सिनेसृष्टीतच नव्हे तर जाहिरात क्षेत्रातही सोनालीने वेगळे स्थान निर्माण केले आहे.