सावळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही...; एक अनोळखी बाई सोनालीला डिवचते तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:41 PM2021-07-12T13:41:55+5:302021-07-12T13:43:13+5:30
सोनाली कुलकर्णीनं सांगितला करिअरच्या सुरूवातीचा शॉकिंग किस्सा, वाचा...
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni ). सोनालीसारख्या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीला कधीकाळी वर्णभेदाचा सामना करावा लागला, यावर विश्वास बसत नाही. पण करिअरच्या सुरूवातीला सोनालीला या अनुभवातूनही जावं लागलं. होय, मराठी चित्रपटसृष्टी व बॉलिवूडनं तिला मोठ्या मनानं स्वीकारलं. पण काही लोकांनी मात्र तिच्या रंगावरून तिला ऐकवण्याची एकही संधी सोडली नाही. एका ताज्या मुलाखतीत सोनालीनं असाच एक किस्सा सांगितला.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीनं वर्णभेदाबद्दल खुलासा केला.
ती म्हणाली, बॉलिवूडमध्ये मला कधीच वर्णभेदाचा सामना करावा लागला नाही. पण पुण्यात मात्र या गोष्टी मी सहन केल्यात. बॉलिवूडनं मला स्वीकारलं. कायम माझं, माझ्या कामाचं कौतुक केलं.मला बॉलिवूडमध्ये रंग भेदाचा सामना करावा लागला नाही. मात्र पुण्यात पहिल्यांदा आॅडिशनसाठी गेले होते, एका बाईनं मला नको ते ऐकवलं होतं. तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटायला गेले होते. तेव्हा तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या मुलीच्या आईनं मला बघितलं आणि तू इथे का आली आहेस? असा प्रश्न मला केला. यावर मी अगदी निष्पापणे गिरीश कर्नाड यांना भेटायला आल्याचं तिला सांगितलं. कारण तोपर्यंत तो प्रश्न विचारण्यामागचा त्या बाईचा उद्देश माझ्या ध्यानात आला नव्हता. पण त्या बाई बोलायच्या थांबल्या नाहीत. तू आरशात कधी तुझा चेहरा पाहिला आहेस? काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही, असं ती बाई मला थेट म्हणाली. त्या बाईच्या त्या शब्दांनी मी लाजीरवाणी झाले होते. 15-20 मिनिटांनंतर मी गिरीश कर्नाड यांना भेटली. त्यांनी माझ्याशी भरभरून गप्पा मारल्या. माझं कौतुक केलं. त्यांच्या त्या कौतुकानंतर बाहेरची ती बाई काय म्हणाली, त्याचं काही महत्त्व उरलं नव्हतं. अर्थात तसंही मी ते फार गंभीरपणे घेतलं नसतं...
सोनालीनं गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. तिनं फक्त मराठी आणि हिंदी सिनेमातच काम केलं नाही तर गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत काम केलं आहे.
मराठीत कैरी, घराबाहेर, देवराई, दोघी, मुक्ता, सखी, अगं बाई अरेच्चा -२ हे तिचे चित्रपट गाजले. तर दिल चाहता है, डरना जरुरी है, दिल विल प्यार व्यार, प्यार तुने क्या किया, सिंघम या हिंदी चित्रपटातही सोनालीनं छाप उमटविली.