क्या बात! नेहाच्या लग्नासाठी बिहारला जाणार सोनू सूद, लॉकडाऊनमध्ये तिच्या बहिणीचा वाचवला होता जीव!
By अमित इंगोले | Published: November 19, 2020 09:05 AM2020-11-19T09:05:29+5:302020-11-19T09:05:44+5:30
सोनू एका ट्विटच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात आनंद भरतो. असाच काहीसा आनंद बिहारच्या आरामध्ये राहणाऱ्या नेहा सहायला मिळाला आहे.
अभिनेता सोनू सूद सिनेमांसोबतच रिअल लाइफमध्येही हिरो म्हणून समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने लाखो लोकांची मदत केली होती. आता तर असं वाटतं की, गरजू लोकांची मदत करणं सोनूच्या आयुष्याचा भागच झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक त्याला संपर्क करतात आणि त्यातील शक्य तेवढ्या लोकांना तो मदत करतो.
सोनू एका ट्विटच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात आनंद भरतो. असाच काहीसा आनंद बिहारच्या आरामध्ये राहणाऱ्या नेहा सहायला मिळाला आहे. नेहाने तिच्या लग्नाची पत्रिका सोनूच्या ट्विटवर ट्विट केली आणि त्याला लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. सोनूने तिचं हे आमंत्रण स्वीकारलं असून लग्नाला येणार असल्याचं सांगितलं आहे.
नेहाच्या लग्नाच्या पत्रिकेवर रिप्लाय करत सोनूने लिहिले की, 'चला बिहारचं लग्न बघुया'. नेहा मुळची आराच्या नवादा पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. तिचं लग्न ११ डिसेंबरला होणार आहे. नेहाने तिच्या लग्नाचं कार्ड ट्विट करत लिहिलं होतं की, सोनू सर, हे तुमच्यासाठी. मी ठरवलं होतं की, देवानंतर पहिली पत्रिका तुम्हाला देणार. तुमच्यामुळे माझी बहीण ठीक आहे आणि संपूर्ण परिवारही. तिच्या या भावनिक पोस्ट ला रिप्लाय करत सोनूने लग्नाला येण्यास होकार दिला आहे.
दरम्यान, कोरोना महामारी दरम्यान सोनूने नेहाच्या बहिणीचं ऑपरेशन केलं होतं. नेहाने एक सप्टेंबर २०२० ला सोनूला टॅग करत ट्विट केलं होतं की, तिची बहीण दिव्या सहाय ऊर्फ चुलबुल आजारी आहे आणि तिला ऑपरेशनची गरज आहे.
त्यावेळी नेहाने ट्विटमध्ये लिहिले होते की, लॉकडाऊनमुळे दिल्ली एम्समध्ये मिळालेल्या तारखेला ऑपरेशन होऊ शकलं नाही. तिने सोनूला आग्रह केला होता की, कशीतरी एम्समध्ये ऑपरेशनची तारीख मिळवून द्यावी. बाकी काही नको.
यानंतर सोनू सूदने नेहाला ट्विटरवर रिप्लाय देत ५ सप्टेंबरला लिहिले होते की, तुझी बहीण माझी बहीण आहे. तिची हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. नंतर ऋषिकेशच्या एम्समध्ये नेहाच्या बहिणीची यशस्वी सर्जरी करण्यात आली. यानंतर दिव्या बरी झाली.
नेहा आणि दिव्याचे वडील उमाशंकर सहाय हे एका कॉलेजमध्ये क्लार्क आहेत. बहिणींमध्ये नेहा मोठी आहे. ती एका शाळेत शिक्षिका आहे. आता नेहाचं लग्न चंडीगढमधील एका बॅंक कर्मचारी असलेल्या मुलाशी होणार आहे. आणि या लग्नाला सोनू सूद हजेरी लावणार आहे.