मुझे क्षमा कीजिएगा...! मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदने का मागितली मजुरांची माफी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 10:08 AM2020-05-28T10:08:22+5:302020-05-28T10:10:37+5:30
तूर्तास सोनू करत असलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण सोनू मात्र आतून काहीसा अस्वस्थ आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांची तो मदत करतोय. या मजुरांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनूचे अथक प्रयत्न सुरु आहेत. या मजुरांसाठी सोनू सूदने नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील जारी केला होता. गावी जाण्यास इच्छूक असलेले मजूर मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात, असें आवाहन सोनू आणि त्याच्या टीमकडून करण्यात आले होते. तूर्तास सोनू करत असलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण सोनू मात्र आतून काहीसा अस्वस्थ आहे. याच अस्वस्थतेपोटी त्याने स्थलांतरीत मजुरांची माफी मागितली आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने मजुरांची माफी मागितली आहे. आता इतके महान काम करणारा सोनू माफी का मागतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कारण आहेच.
आपके संदेश हमें इस रफ़्तार से मिल रहें हैं। मैं और मेरी टीम पूरी कोशिश कर रहें हैं हर किसी को मदद पहुँचे! लेकिन अगर इस में हम कुछ मेसजेज़ को मिस कर दें, उसके लिए मुझे क्षमा कीजिएगा 🙏 pic.twitter.com/wS7vVk9bjv
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020
त्याचे झाले असे की, सोनूने हेल्पलाइन नंबर जारी केल्यानंतर त्या नंबरवर अनेकांनी संपर्क केला. अनेकांना आपापल्या घरी पोहोचण्याची आशा निर्माण झाली. यातील अनेकांना सोनू सूदने मदत केली असली, तरी काही मॅसेज किंवा फोनकडे त्याला लक्ष देताआले नाही. अशा मजुरांची आणि प्रवाशांची त्याने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
सोनूने त्याच्या मोबाइलवर येणा-या मॅसेजेसचा एक व्हिडीयो शेअर केला. ‘तुमचे मॅसेज आमच्यापर्यंत वेगाने पोहोचत आहेत. तुम्हा सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्याचे माझे व माझ्या टीमचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत़. मात्र या दरम्यान आम्ही काही मॅसेज वाचू शकलो नसू तर त्याकरता मला क्षमा करा’, असे सोनू म्हणतोय.
सोनूने आत्तापर्यंत हजारो मजूरांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवले आहे. त्याच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तर तो ‘लॉकडाऊन हिरो’ म्हणूनच ओळखला जातोय. ट्विटरवर तो ट्रेंड करतोय. इतकेच नाही तर त्याचे कौतुक करणारे मीम्स देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.