शाब्बास! अर्ध्या रात्री कॉल आला अन् सोनू सूदची टीम कामाला लागली, वाचवले 22 रूग्णांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:34 PM2021-05-05T12:34:03+5:302021-05-05T12:39:25+5:30
Sonu Sood : काल अर्ध्यारात्री बेंगळुरातील एआरएके रूग्णालयात बिकट स्थिती उद्भवली. ऑक्सिजन संपला आणि येथे दाखल असलेल्या अनेक रूग्णांचे जीव धोक्यात आले....
त्सुनामी बनून आलेली कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. अशात ऑक्सिजन व रूग्णालयातील बेड्सच्या कमतरतेमुळे लोक हवालदिल झाले आहेत. अनेक लोक मदतीची याचना करताना दिसत आहेत. अशात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस राबून कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मदत करतोय. काल मंगळवारी सोनूमुळे बेंगळुरातील 22 कोरोना रूग्णांना जीवनदान मिळाले.
काल अर्ध्यारात्री बेंगळुरातील एआरएके रूग्णालयात बिकट स्थिती उद्भवली. ऑक्सिजन संपला आणि येथे दाखल असलेल्या अनेक रूग्णांचे जीव धोक्यात आले. ही माहिती कळताच सोनू व त्याची टीम क्षणाचाही विलंब न करता कामाला लागली आणि काही तासांत 15 ऑक्सिजन सिलिंडर रूग्णालयात पोहोचलेत.
रिपोर्टनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनूच्या टीममधील एका सदस्याला येलाहंका भागातील इन्स्पेक्टर एमआर सत्यनारायण यांनी फोन केला. एआरएके रूग्णालयाची स्थिती बिकट आहे. मदत हवी आहे. ऑक्सिजनअभावी आधीच दोन रूग्णांचा जीव गेला आहे, असे त्यांनी सांगितले. यानंतर सोनू सूदच्या टीमने अर्ध्या रात्री आपल्या सर्व कंत्राटदारांना झोपेतून उठवले आणि काहीख तासांत 15 सिलिंडर रूग्णालयात दाखल झालेत.
सोनू सूदने याबद्दल सांगितले. ‘ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आम्ही त्या रूग्णांचे प्राण वाचवू शकलो, यासारखे मोठे समाधान नाही. हे उत्तम टीमवर्कचे उदाहरण आहे. शिवाय देशवासियांच्या मदतीच्या इच्छाशक्तीचा परिणाम आहे. सत्यनारायणजींचा फोन येताच आम्ही कन्फर्म केले आणि कामाला लागलो. या कामी मदत करणा-या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या टीमचेही मी आभार मानतो. त्यांचा मला अभिमान आहे,’ असे तो म्हणाला.