नव्या घरात गृहप्रवेश झाला अन् चिरंजीवींच्या चाहत्यांची ‘ती’ इच्छा पूर्ण झाली...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 08:00 AM2020-08-22T08:00:00+5:302020-08-22T08:00:03+5:30
साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा आज वाढदिवस.
तेलगु सिनेमांचा बॉस म्हणून ओळखले जाणारे साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा आज वाढदिवस. आज चिरंजीवी अभिनयासोबतच राजकारणातलाही मोठा चेहरा आहे. पण सिने चाहत्यांचे म्हणाल तर त्यांच्यासाठी तो फक्त त्यांचा आवडता सुपरस्टार चिरंजीवी आहे. कोन्डिला शिवा शंकरा वरा प्रसाद हे चिरंजीवी यांचे खरे नाव. 22 ऑगस्ट 1955 साली एका कॉन्स्टेबलच्या घरी त्यांचा जन्म झाला. चिरंजीवी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुढे कॉलेजमध्ये गेल्यानंतर ही आवड आणखीच वाढली आणि त्यांनी चेन्नई येथील अॅक्टींग स्कुलमध्ये प्रवेश घेतला.
चिरंजीवी यांचे कुटुंब अंजनेय या हिंदू देवतेचे उपासक होते. त्यामुळे आईने त्यांना ‘चिरंजीवी’ हे नाव दिले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. आज चिरंजीवी म्हटले की, पुढे येतो तो एका सुपरस्टारचा चेहरा, इतके या नावाला वलय प्राप्त झाले. चिरंजीवी यांनी 1979 साली ‘पुनाधिरल्लू’ या सिनेमातून फिल्मी करिअरला सुरुवात केली. आश्चर्य वाटेल पण या पहिल्याच वर्षांत त्यांच्या एका पाठोपाठ एक असे 8 सिनेमे रिलीज झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी 14 सिनेमे प्रदर्शित झालेत. हे सर्व सिनेमे लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेत.
चिरंजीवी यांच्याकडे 1300 कोटी रूपयांची प्रॉपर्टी आहे. अभिनेता चिरंजीवी यांचे हैदराबाद येथे असणारे घर ज्युबिली हिल्स या पॉश परिसरात आहे. तेथे ते कुटुंबासह राहतात. असे म्हणतात की हे घर बांधण्यासाठी चिरंजीवी यांनी खास एक डोंगर विकत घेतला होता. चिरंजीवी यांच्यासाठी हे घर प्रचंड लकी आहे. कारण या घरात राहायला गेल्यानंतर चिरंजीवी यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून चिरंजीवी यांचे चाहते या पुरस्काराची वाट पाहत होते. मात्र या घरात राहायला गेल्यानंतर त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हे घर त्यांना लकी आहे असे म्हणतात.