श्रीकृष्णा मालिकेत सुभद्राच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री आहे आता प्रसिद्ध गायकाची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:44 PM2020-05-07T12:44:34+5:302020-05-07T12:52:43+5:30
या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केले असून तिने काहीच वर्षांपूर्वी या प्रसिद्ध गायकासोबत लग्न केले आहे.
सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
श्रीकृष्णा ही जुनी मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेत श्रीकृष्णाच्या बहिणीच्या म्हणजेच सुभद्राच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री सोनिया कपूरला पाहायला मिळाले होते. सोनियाने याशिवाय कुसूम, जुगनी लगी जलंधर, कुमकुम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, सोनिया ही एका प्रसिद्ध गायकाची पत्नी असून काहीच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झालेले आहे.
सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे हिमेश रेशमियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेरे नाम या चित्रपटामुळे मिळाली. संगीत दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केल्यानंतर तो गायन आणि अभिनयाकडे वळला. हिमेशचे लग्न सोनिया कपूरसोबत झालेले असून त्याचे हे दुसरे लग्न आहे. हिमेश आणि सोनियाच्या अफेअरची चर्चा अनेक वर्षं मीडियात होत असली तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी मे २०१८ ला अचानक लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी धुमधडाक्यात लग्न न करता कोर्ट मॅरेज करणे पसंत केले होते.
हिमेशने सोनियासोबत लग्न करण्यासाठी त्याची पहिली पत्नी कोमलला लग्नाच्या २२ वर्षानंतर घटस्फोट दिला. हिमेश आणि कोमलला स्वयम नावाचा मुलगादेखील आहे. हिमेश आणि कोमलच्या घटस्फोटाला सोनिया कारणीभूत असल्याची चर्चा त्यावेळी मीडियात चांगलीच रंगली होती. हिमेश लग्नाआधी सोनियासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे देखील म्हटले जाते.
२००६ पासून हिमेश आणि सोनियाच्या अफेयरची मीडियात चर्चा सुरू होती. पहिले चार वर्षे तर हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रीण’ अशीच करून दिली होती. पण काही काळाने त्यांच्या नात्याविषयी त्याच्या घरातल्यांना कळले. त्यामुळे कुटुंबियांच्या विरोधामुळे काही काळासाठी ते दोघे एकमेकांपासून दूर राहिले. परंतु हिमेशच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा एकत्र आले. कोमलला सोनिया आणि हिमेशच्या नात्याविषयी पूर्ण कल्पना होती. तरीपण तिने कधीच त्याला उघडपणे विरोध केला नाही असे देखील म्हटले जाते.