एस एस राजमौलींनी इंटरनॅशनल कॅम्पेनवर केला 'इतका' खर्च, 'RRR' मिळेल का ऑस्कर?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 11:03 AM2023-03-05T11:03:25+5:302023-03-05T11:05:30+5:30
RRR : आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.
एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला होता. ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट, अजय देवगणच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा ऑस्करवर नाव कोरणार का याकडे आता संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे. 'आरआरआर'च्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब जिंकल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत 'आरआरआर' बाजी मारताे की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. अर्थात भारतीय चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो. 'आरआरआर'चा प्रवासही सोपा नाहीच.
ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाल्यापासून ते पुरस्काराची घोषणा होईपर्यंतची प्रक्रिया तब्बल ६ महिने चालते. ‘द अकॅडमी’चे जगभरात जवळपास ६३०० सदस्य आहेत. त्यात भारताचे ५०च्या जवळपास सदस्य आहेत. यामध्ये अर्ध्याहून जास्त सदस्यांची मतं मिळाली म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ऑस्कर मिळतो. ही मतं मिळवण्याची प्रक्रिया मुळीच सोपी नसते. इथल्या प्रत्येक सदस्यापर्यंत आपला चित्रपट पोहोचवावा लागतो. या प्रक्रियेसाठी पीआर संस्थेची मदत घ्यावी लागते. तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही द्यावे लागतात. तुमच्या चित्रपटाचं संपूर्ण भवितव्य पीआर अवलंबून असतं. साहजिकच यावर कोट्यवधींचा खर्च होतो. आपल्या सिनेमाच्या परदेशातील कॅम्पेनसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. हा सगळा खर्च एखाद्या मोठ्या सिनेमाच्या बजेटइतकाही असू शकतो. 'आरआरआर' ही याला अपवाद नाही. चर्चा खरी मानाल तर 'आरआरआर'च्या ऑस्कर व गोल्डन ग्लोब कॅम्पेनसाठीही मेकर्सनी आत्तापर्यंत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे.
रिपोर्टनुसार, 'आरआरआर' ऑस्कर २०२३ च्या शर्यतीत आहे. या सिनेमाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅम्पेनवर आत्तापर्यंत सुमारे ८३ कोटींचा खर्च झाल्याचं कळतंय. हाेय, निर्मात्यांनी यांनी RRRला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोट करण्यासाठी ८३ कोटी रुपये खर्च केले. खर्चाचे हे आकडे किती खरे किती खोटे, याबाबत आम्ही दावा करत नाही. पण हे आकडे खरे असतील तर या ८३ कोटींत एक दुसरा सिनेमा तयार झाला असता, हे नक्की.