RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 04:14 PM2022-03-25T16:14:27+5:302022-03-25T16:15:40+5:30

SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट?

SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr | RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

googlenewsNext

कलाकार - ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट, अजय देवगण

दिग्दर्शक - एस. एस. राजमौली 

चित्रपटाचा अवधी - 3 तास 6 मिनिटं

----------------------

SS Rajamouli's RRR review :  एस. एस. राजमौली  (S S Rajamouli) हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. इगा (मख्खी), मगधीरा, बाहुबली आणि बाहुबली 2  अशा भव्यदिव्य चित्रपटानंतर चित्रपटगृहांत गर्दी खेचून आणण्यासाठी राजमौली हे नावच पुरेसं आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. हा चित्रपट कसा आहे? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

चित्रपटाची कथा
स्वातंत्र्यापूर्वीचं 1920 हे दशक आणि या दशकातील कथा ‘आरआरआर’ या सिनेमात पाहायला मिळते. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) हे दोन क्रांतिकारी. एक आग तर एक पाणी. राम हा जुलमी ब्रिटीश राजवटीतील पोलिस अधिकारी असतो. ब्रिटीशांविरोधात बंड करणाऱ्या क्रांतिकाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचं काम राम करत असतो आणि भीमाला पकडणं हे त्याचं नवं मिशन असतं. याचदरम्यान मल्ली नावाच्या एका आदिवासी मुलीला केवळ तिचा आवाज चांगला आहे म्हणून इंग्रज  उचलून नेतात. भीम या मुलीला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याची शपथ घेतो आणि थेट दिल्ली गाठतो.  तिथेच राम त्याला भेटतो. या दोघांची मैत्री होते. इतकी की एकमेकांसाठी जीव द्यायलाही दोघं तयार होतील.   पुढे ही मैत्री कोणत्या वळणावर जाते? आपण एकमेकांचे पक्के वैरी आहोत हे कळल्यावर राम व भीमाच्या मैत्रीचं काय होतं? मल्लीला सोडवण्यात भीम यशस्वी होतो का? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल.  

कसा आहे सिनेमा?
‘आरआरआर’ हा सिनेमा कसा आहे? या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर हवं असेल तर ‘पैसा वसूल’ असंच दोन शब्दांत  उत्तर द्यावं लागेल. प्रेक्षकांचं मन कसं जिंकायचं, हे राजमौलींना नेमकं ठाऊक आहे आणि आरआरआरच्या निमित्तानं ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. 550 कोटी रूपये बजेटचा हा सिनेमा तुम्हाला 3 तास 6 मिनिटं खिळवून ठेवतो. राजमौली आणि त्यांच्या अख्ख्या टीमनं या चित्रपटात आपलं 100 टक्के दिलं आहे. पडद्यावरचे अनेक सीन्स अंगावर काटा आणतात. विशेषत: रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरची एन्ट्री थक्क करते.  लार्जर दॅन लाईफ सीन्स  आणि तेवढीच जबरदस्त सिनेमेटोग्राफी पाहताना हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.

कलाकारांचा अभिनय
रामचरण व ज्युनिअर एनटीआर या दोन साऊथ सुपरस्टार्सनी अगदी जीव तोडून काम केलं आहे. त्यांची मेहनत क्षणोक्षणी जाणवते. दोघांची ‘पॉवरपॅक्ड अ‍ॅक्शन’ आणि ‘फुल्ल टू इमोशन्स’ची जुगलबंदी प्रेमात पाडते. अजय देवगणने या चित्रपटात रामच्या पित्याची भूमिका साकारली आहे. त्याचा रोल फार मोठा नाही. पण या छोट्या भूमिकेतही तो छाप सोडून जातो. आलिया भटसाठी या चित्रपटात करण्यासारखं फार काही नव्हतंच. तिच्याजागी आणखी दुसरी कुणी हिरोईन असती तरी चालली असती.  वाट्याला आलेलं काम आलियानं प्रामाणिकपणे पूर्ण केलंय, इतकंच.  

पहावा की पाहू नये?
सिनेमाचा फर्स्ट हाफ अक्षरश: खिळवून ठेवतो. सेकंड हाफमध्ये चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना काही गोष्टी खटकतात. विशेषत: वेळ कमी करण्याच्या नादात क्लायमॅक्स  गंडल्यासारखा वाटतो. क्लायमॅक्स पूर्ण करताना दिग्दर्शकानं घाई केल्याचं जाणवतं. अर्थात तरिही चित्रपटाची संकल्पना प्रेक्षकांना समजावी हा राजमौलींचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरतो. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स वेगळी अनुभूती देतात. हे व्हिज्युअल इफेक्ट्स कुठेही अतिशयोक्ती वाटणार नाहीत, याची काळजी राजमौलींनी घेतली आहे.

एकंदर काय तर कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची कथा, त्याची संकल्पना, गाणी, दिग्दर्शन, अ‍ॅक्शन सगळंच तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. राजमौलींचा हा सिनेमा एक मास्टरपीस आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. चित्रपट एंटरटेनिंग आहे आणि चित्रपटगृहात जाऊन बघावा असाच भव्यदिव्य आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरची जुगलबंदी आणि राजमौलींचं दिग्दर्शन यासाठी ‘आरआरआर’ एकदा पाहायलाच हवा.

Web Title: SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.