लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी ‘सिंटा’चे एक पाऊल पुढे, स्वरा भास्कर, रवीना टंडन, रेणुका शहाणे यांची समिती गठीत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 04:21 PM2018-10-18T16:21:21+5:302018-10-18T21:30:00+5:30
या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल.
हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसागणिक लैगिक अत्याचार आणि शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा एक महिलांची समिती गठीत करणार आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल. या समितीबाबत चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींशी सल्लामसलत सुरू असल्याची माहिती सिंटाचे सरचिटणीस सुशांत सिंह यांनी दिली आहे. लवकरच या समितीचे गठन करण्यात येणार आहे. या संदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करने या संदर्भात आपल्याशी चर्चा केली असल्याची माहितीही सुशांत सिंह यांनी दिली आहे.
अशा घटना आणि आरोपांसदर्भात स्वरा स्वतःच्या पातळीवर गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहे. त्यामुळे तिला या समितीचे सदस्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की सिंटा आणि स्वरा दोघंही एकच काम करत आहेत, त्यामुळेच लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करेल अशी समिती बनवण्याचा सिंटाचा विचार असल्याचे सुशांत सिंह यांनी सांगितले आहे. लैंगिक अत्याचार रोखण्यासंदर्भात पीडितांचे समुपदेशन करण्याचे काम वकील वृंदा ग्रोव्हर या करतील असं सुशांत सिंह यांनी सांगितले. ही समिती अत्यंत कार्यक्षम असावी जेणेकरून लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल. त्या आरोपीला चित्रपटसृष्टीत काम मिळू नये या दृष्टीने या समितीने काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात अनेकांना चित्रपटसृष्टीत संधी देणाऱ्या निर्मात्यांशीही बोलणार असल्याची माहिती सिंह यांनी दिलीय.
सिनेजगतातील कलाकारांवर आरोप लागल्यानंतर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन म्हणजेच सिंटाने पीडित महिलांना पाठिंबा दिला आहे. तसेच सिंटाने आरोप केलेल्या व्यक्तींना नोटीस पाठवून उत्तर मागवले होते. या मुद्द्याला घेऊन सिंटाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विक्रम गोखले यांनी आपले मत मांडताना सांगितले की, चाळीस वर्षांपासून मी सिंटाचा सदस्य आहे. सिंटा खूप चांगले काम करत आहे आणि सध्या मीटू मोहिमेअंतर्गत जे काही समोर येत आहे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. सिंटा ही फक्त संघटना नसून हे सगळे कलाकार आमचेच आहेत. आम्ही कोणताही भेदभाव करत नाही. सगळे कलाकार आमच्यासाठी समान आहेत. आता तनुश्री दत्ता व नाना पाटेकर वादावर आता काहीही बोलणार नाही. या प्रकरणाचा आम्ही अभ्यास करीत आहोत. न्यायप्रविष्ठ असल्यामुळे आता यावर बोलणे उचित ठरणार नाही.