'आईचे अंत्यविधी करुन दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो तेव्हा..'; राजकुमार रावची भावुक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:26 AM2024-10-14T11:26:40+5:302024-10-14T11:27:36+5:30
आईच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलेल्या राजकुमार रावची अवस्था काय झाली होती, याचा किस्सा त्याने सांगितलाय (rajkumar rao)
राजकुमार राव हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. राजकुमारला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. राजकुमार रावने LSD सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर 'गँग ऑफ वासेपूर', 'काय पो चे' पासून नुकताच रिलीज झालेला 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' सिनेमापर्यंत राजकुमार रावच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत राजकुमार रावने त्याच्या आयुष्याबद्दलची एक भावनिक गोष्ट सर्वांसमोर उलगडली.
शूटींग करतानाच आईच्या निधनाची वार्ता आली अन्...
समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार रावने हा किस्सा सांगितला. राजकुमार राव तेव्हा 'न्यूटन' सिनेमाचं शूटींग करत होता. छत्तीसगडच्या जंगलात शूटिंग करत असल्याने फोनला नेटवर्क नव्हतं. अशातच सिनेमाचा एक सीन शूट करुन राजकुमार बाहेर येत होता. त्यावेळी दूरवर त्याला एक माणूस जोरात धावत त्याच्याजवळ येताना दिसला. काहीतरी वाईट खबर आहे, याची कुणकुण राजकुमारला लागली. वडील वारले असतील, असा प्राथमिक विचार सुरुवातीला त्याच्या मनात आला. पण नंतर फोनवर त्याची पार्टनर पत्रलेखाने आई गेल्याची खबर त्याला सांगितली.
ही दुःखद वार्ता ऐकताच राजकुमारला काय कळावं सुचलं नाही. शूटींग अर्ध्यावर सोडून जाणं म्हणजे सिनेमाचं नुकसान होणार होतं. तरीही राजकुमारने सिनेमाच्या टीमला मी एका दिवसात परत येतो असं सांगितलं. पुढे राजकुमार गुरगावला हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने अंत्यविधी करुन लगेचच दुसऱ्या दिवशी शूटींगला सुरुवात केली. त्याला वाटलं शूटींग सहज होईल. पण नंतर त्याला खूप भीती वाटली. शूटींग करताना खूप अडचण आली. "आपण पालकांना खूप गृहीत धरतो. त्यांच्यासोबत आणखी काही वेळ घालवला पाहिजे होता.", याची राजकुमारला खंत आहे. नुकताच रिलीज झालेला 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' हा राजकुमार रावचा पिक्चर चांगलाच गाजतोय. याशिवाय १५ ऑगस्टला रिलीज झालेला राजकुमार रावच्या 'स्त्री २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केलीय.