‘स्त्री २’ची यशस्वी घोडदौड; ९व्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला, 'फायटर'लाही देतोय टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 01:48 PM2024-08-24T13:48:57+5:302024-08-24T13:53:52+5:30
Stree 2 : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ चित्रपटाची जादू कायम आहे.
Stree 2 box Office Collection : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ चित्रपटाची जादू कायम आहे. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी या चित्रपटात घडवलेला हॉरर-कॉमेडीचा संगम प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. हा चित्रपट या वर्षातील हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीच आपलं स्थान पक्कं करेल एवढं मात्र नक्की! अजूनही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ९ व्या दिवशी चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन १६.५० कोटी इतकं आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते आहे.
मागच्या वर्षी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या रूपात जानेवारीतच हिंदी सिनेसृष्टीला पहिला ब्लॉकबस्टर मिळाला होता. त्यानंतर शाहरुखचा ‘जवान’, सनी देओलचा ‘गदर २’, रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ या चित्रपटांनी सिने-रसिकांना भूरळ घातली होती. या वर्षी मात्र हिंदी सिनेसृष्टीला पहिल्या ब्लॉकबस्टरसाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. यंदा प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियां छोटे मियां’, ‘मैदान’, ‘योद्धा’, ‘वेदा’ आदी चित्रपटांकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्यांनी घोर निराशा केली.
सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार,‘स्त्री २’ने अवघ्या ९ दिवसात जगभरात ३०८.१५ कोटी इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित झाला असला, तरी त्याच्या पूर्वसंध्येलाच या चित्रपटाचे अनेक शो हाउसफुल्ल झाले. पहिल्या दिवशी काही चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे २६ ते ३० शो दाखवण्यात आले.
या बळावर या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५.४० कोटींचा व्यवसाय करत पहिल्याच दिवशी सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी धडाकेबाज व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांमध्ये ६५.५० कोटींची कमाई करत ‘जवान’ पहिल्या स्थानावर आहे. ५५ कोटी रुपयांसह ‘पठाण’ तिसऱ्या, ५४.७५ कोटींसह ‘ॲनिमल’ चौथ्या, तर ५३.९५ कोटींसह ‘केजीएफ’ हिंदी पाचव्या स्थानी विराजमान आहे.
तीनपैकी एका चित्रपटालाच यश-
मागच्या आठवड्यात तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, पण एकाच चित्रपटाला भरघोस यश मिळाले. ‘स्त्री २’सोबत अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर, ॲमी विर्क, फरदीन खान यांचा ‘खेल खेल में’ चित्रपट आला, पण हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. या चित्रपटांना २० कोटींचा आकडाही पार करता आला नाही. ‘वेदा’मध्ये शर्वरी वाघने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर १७ कोटींपर्यंतच मजल मारू शकला.
१,१०० कोटींचा व्यवसाय-
यंदा जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ने भारतात २३७ कोटी रुपये, तर जागतिक पातळीवर ३३७.२ कोटींची कमाई केली आहे, पण या चित्रपटाकडून आणखी व्यवसायाची अपेक्षा होती. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘कल्की’ने जगभरात १,१०० कोटींचा व्यवसाय केला आहे. हा मूळ तेलुगू चित्रपट असून, देशभरात प्रदर्शित करण्यात आला. अजूनही हा चित्रपट काही सिनेमागृहांमध्ये सुरू आहे. ‘स्त्री २’ चा बॉक्स ऑफिसवर अशाप्रकारे दबदबा कायम राहिल्यास 'फायटर' सिनेमाचा रेकॉर्ड हा चित्रपट ब्रेक करेल.